स्थैर्य, सातारा : लॉकडाऊनचे उल्लंघन करुन मुंबईतून सातारा जिल्ह्यात आलेल्या मुंबई पोलीस दलातील एका कर्मचार्याने मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गंभीर जखमी केले होते. केवळ पोलीस असल्याने फलटण येथील वैद्यकीय अधिकारी व फलटण शहरमधील पोलिसांनी संगनमताने संबंधित पोलीस कर्मचार्याचा मद्यधुंद असतानाही वैद्यकीय अहवाल त्या पोलिसाच्या बाजूने दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा खोलात जावून पुन्हा तपास करुन अपघातास कारणीभूत ठरलेल्या त्या पोलिसावर कठोर कारवाईची मागणी आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार उर्फ सागर भोगावकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, बापूराव दिनकर निकाळजे (वय 56, रा. गिरवी, ता. फलटण) हे बिजवडी, ता. माण येथील जिल्हा मध्यवर्ती सह. बँक लि. येथे रोखपाल या पदावर कार्यरत आहेत. दि. 8 जून 2020 रोजी ते सायंकाळी बँकेचे काम आटोपून फलटणकडे निघाले होते. साधारणत: सायंकाळी पाच वाजून 10 मिनिटाच्या सुमारास ते झिरपवाडी गावच्या हद्दीतील वर्षा ढाब्याजवळ आले असता फलटण बाजूकडून दहिवडीकडे निघालेल्या सँट्रो कार क्र. एमएच 02- एल ए 8618 या वाहनाने बापूराव निकाळजे यांची दुचाकी क्र. एमएच 11 – एटी 1142 ला विरुद्ध दिशेने येत जोरदार धडक दिली. यावेळी दुचाकी चालवित असलेले बापूराव निकाळजे व पाठिमागे बसलेले आनंदराव पांडुरंग घाडगे यांना कारची जोरदार धडक बसल्याने ते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले. यामुळे या दोघांनाही गंभीर दुखापत झाली. यावेळी रस्त्यावरुन येणार्या-जाणार्या ओळखीच्या लोकांनी या दोघांना फलटण येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघातस्थळी उपस्थित असलेले सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दुधेबावी शाखेचे कर्मचारी बाळू ज्ञानदेव अवघडे यांनी संबंधित कारचालकाला गाडी नीट चालविता येत नाही काय? असा जाब विचारला असता संबंधिताने मी मुंबई पोलीसदलात पोलीस कर्मचारी आहे, तसेच मी पोलीस असल्याने माझे कोणीही काही वाकडे करु शकत नाही, असा त्यांना दम भरला. यावेळी संबंधिक कारचालक उत्तम संपत पवार (रा. वरळी पोलीस कॅम्प, शामा क्वार्टर, रुम नं. 6, वरळी) हा अपघातावेळी मद्यधुंद अवस्थेत होता. तसेच त्याच्या अपघातग्रस्त कारमध्येही दारुच्या बाटल्या इस्तत विखुरलेल्या होत्या. यानंतर संबंधित पोलीस कर्मचार्याची मेडिकल करुन त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला.
परंतू संबंधित पोलीस कर्मचार्याने मद्यधुंद अवस्थेत कार चालवूनही फलटण उपजिल्हा रुग्णालयातील मेडिकल ऑफिसर व फलटण शहर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्यांना मॅनेज करुन तो मद्यधुंद अवस्थेमध्ये नसल्याची नोंद केली गेली. या अपघातामध्ये दोघांनाही गंभीर स्वरुपाची दुखापत झाली आहे. तसेच दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित पोलीस कर्मचारी हा मुंबई पोलीसदलात कार्यरत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. सातारा जिल्ह्यात येताना जिल्हाधिकार्यांच्या परवानगीशिवाय प्रवेश मिळत नाही. असे असताना तो कर्मचारी रेड झोन असलेल्या मुंबईतून सातारा जिल्ह्यात आलाच कसा? याबाबतही चौकशी व्हावी. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या या मस्तवाल पोलीस कर्मचार्यावर कारवाईची मागणी जिल्हा पोलीस प्रमुखांकडे करण्यात आली आहे.