दैनिक स्थैर्य | दि. १७ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील बेजबाबदार, कर्तव्यात कसूर करणार्या रुग्णसेविका, नर्सेस व स्टाफ यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष हरिश काकडे यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्यांकडे केली आहे.
काकडे यांनी केलेल्या अर्जात म्हटले आहे की, फलटण शहर व तालुक्यातील शेकडो सर्वसामान्य लोक रोज वैद्यकीय उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात येत असतात; परंतु या ठिकाणी काम करत असलेला रुग्णसेविकांचा स्टाफ, वॉर्डबॉय तसेच इतर कर्मचारी बेजबाबदारपणे काम करत आहेत. या कर्मचार्यांकडून रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना चांगली वागणूक दिली जात नाही, त्यांना अपमानित केले जाते. रुग्णालयातील रुग्णसेविका गिरमे या वृद्ध महिला, पुरूष यांना एकेरी व अरेरावीची भाषा वापरत आहेत. तसेच रुग्णांना सेवा देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे रुग्ण येथून अर्धवट उपचार घेऊन घरी जात आहेत.
रुग्णालयातील लॅबच्या टेस्ट रिपोर्टमध्येही अदलाबदल होत असून चुकीचे रिपोर्ट दिले जात आहेत. ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या उपजिल्हा रुग्णालयातील स्वच्छता चिंताजनक आहे. रुग्णालयात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. प्रसाधनगृहात स्वच्छता नाही. पाण्याची व्यवस्था नाही. त्याचबरोबर चांगल्या प्रतीचे जेवण दिले जात नसून रुग्णाच्या बेडवर दैनंदिन स्वच्छता ठेवली जात नाही.
रुग्णांना बाहेरून औषधे आणण्यास सांगू नये, तर त्यांना रुग्णालयातच औषधे देण्यात यावीत. अस्थिरोगतज्ज्ञ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावेत. दिवस व रात्रपाळीसाठी नियमात दिलेल्या वेळेत डॉक्टर उपस्थित असावेत.
वरील मागण्यांबरोबरच बेजबाबदार नर्सेस, इतर आरोग्य सेवक व स्टाफवर कारवाई करून त्यांना निलंबित करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा हरिष काकडे यांनी दिला आहे.
वैद्यकीय अधिकार्यांना निवेदन देताना हरिष काकडे यांच्याबरोबर विकी काकडे, लक्ष्मण काकडे, प्रफुल्ल अहिवळे, विशाल पोतेकर, सनी कदम व सचिन अहिवळे हे कार्यकर्ते उपस्थित होते.