शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी तंत्रज्ञान पोहोचवा – कृषीमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


कृषीमंत्र्यांनी साधला यवतमाळ जिल्ह्यातील हटवांजरी येथील शेतकऱ्यांशी संवाद

स्थैर्य, यवतमाळ, दि. 5 : कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार होण्यासाठी राज्यात कृषी संजीवनी सप्ताह राबविला जात आहे. पिकांची उत्पादकता वाढावी, गुणवत्ता सुधारावी याकरीता आधुनिक कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवा, अशा सुचना कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या.

मारेगाव तालुक्यातील हटवांजरी येथे महिलांची शेतीशाळा व कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त ज्योती बंडूजी धाने यांच्या शेतावर शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी, जि.प.अध्यक्षा कालिंदा पवार, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, माजी आमदार विश्वास नांदेकर, कृषी विभागाचे विभागीय सहसंचालक सुभाष नागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.

कृषी संजीवनी सप्ताहादरम्यान कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, असे सांगून कृषीमंत्री भुसे म्हणाले, पुढील काळात शेतीतील शारीरिक कष्टाची कामे तांत्रिक पद्धतीने कशी करावीत याविषयी प्रशिक्षण देण्यात येईल. तसेच फवारणी यंत्र, नोझल कोणते वापरावे, रासायनिक खतांचा वापर कसा कमी करता येईल, विषबाधाच्या दुर्घटना कशा थांबवता येईल, या सर्व बाबींचेसुद्धा प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले जाईल. बियाणे उगवण शक्तीचा प्रयोग केला होता का, तो कसा केला, तुम्ही केलेल्या प्रयोगातून नवीन काही शिकायला मिळाले का, इतरांनी काय सुधारणा कराव्या आदी माहिती कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांकडून जाणून घेतली. शेतीशाळा प्रशिक्षणामुळे जे शिकायला मिळाले ती माहिती गावातील इतर महिलांनाही द्या. तसेच कृषी विभागातर्फे होणाऱ्या मार्गदर्शानाचा तळागाळातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे, वनमंत्री संजय राठोड यांनी हटवांजरी येथे महिलांच्या शेतीशाळेत प्रत्यक्ष शेतावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. फुल नांगरणीचे फायदे काय, वखरणी, बियाण्याची निवड कशी करावी, याबाबत देखील त्यांनी महिला शेतकऱ्यांना विचारणा केली. यावेळी निंबोळ्यापासून खत बनवण्याचे प्रात्यक्षिक मंत्रीमहोदयांना प्रदर्शनीत दाखविण्यात आले. बांबूपासून तयार करण्यात आलेले साहित्य देखील प्रदर्शनीत ठेवण्यात आले होते.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!