स्थैर्य, सातारा, दि. २५ : देशात संपूर्ण राज्यात करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यातही देशाची राजधानी असलेल्या दिल्ली येथेही मोठ्या प्रमाणात रुग्ण असतानाही दिल्ली व्यवस्थित चालू आहे. मग साताऱ्यात कडेकोट लॉकडाऊन का? असा प्रश्न सातारचे राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री छ. उदयनराजे भोसले यांनी केला आहे. सातारा येथे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हाधिकारी आणि डॉक्टरांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
यावेळी बोलताना उदयनराजे म्हणाले की सध्या दिवसभर सकाळी नऊ ते दोन वाजण्याच्या दरम्यान करोना येणार नाही का? मला हे अजिबात पटत नाही .
आपण लवकरात लवकर टाळेबंदी मध्ये शीथीलता आणावी.आणि या टाळेबंदी मुळे सर्वसामान्य नागरिकांचे जनजीवन विस्कळित झाले आहे .तसेच गरजू आणि गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल सुरू आहेत. सध्या सातारा जिल्ह्यावर जो लॉकडाऊन माथी मारला गेला आहे तो तात्काळ उठवावा आणि गोरगरिबांचे तसेच शेतकऱ्यांचे जनजीवन सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने मदत करावी.