
स्थैर्य, सातारा, दि.10 नोव्हेंबर : महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे शाहूपुरी शाखा आणि मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि. 1 जानेवारी ते 4 जानेवारी 2026 दरम्यान होणार आहे. संमेलनासाठी निवासी, अनिवासी प्रतिनिधी नोंदणी 8 नोव्हेंबरपासून सुरु झाली असून दि.10 डिसेंबर 2025 पर्यंत नोंदणी करावी, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
पत्रकात, सातार्यात तब्बल 32 वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि सातार्याच्या लौकिकाला साजेसे होण्यासाठी संयोजक प्रयत्नशील आहेत. या संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी सुरु झाली असून इच्छुकांनी ऑनलाईन नोंदणी करायची असून त्यासाठी https://tender.abmsssatara.org/pratinidhi-nondani या लिंकवर जाऊन नोंदणी करावी. तसेच निवासी, अनिवासी प्रतिनिधीसाठी लागणारे शुल्क बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेच्या कोणत्याही शाखेत रोख अथवा ऑनलाईन पध्दतीने (खात्याचे नाव :- मावळा फौंडेशन, बँकेचे नाव व शाखा बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा सातारा शहर, खाते क्रमांक 60537962109 आय.एफ.एसी. कोड एम.ए.एच.बी.0000134) येथे भरायचे आहे. त्यासाठी महेंद्र पुराणिक, संजय काटकर, उमेश साठे, आकाश शेटे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत यांनी केले आहे.
प्रतिनिधीसाठी नोंदणी केलेल्यांसाठी 1 जानेवारी 2026 रोजी दुपारी 2 वाजल्यापासून ते 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत प्रतिनिधीसाठी निवास व्यवस्था करण्यात येईल. प्रतिनिधीसाठी एका रूम मध्ये शेअरिंग पध्दतीने किमान तीन जणांची व्यवस्था असेल व त्यासाठी शुल्क भरणे आवश्यक आहे. कॉमन हॉल मध्ये राहण्याच्या सोयीसाठी प्रतिनिधी शुल्क वेगळे आकारले जाईल. निवास व्यवस्था शुल्क मध्येच निवासी प्रतिनिधींसाठी 1 जानेवारी 2026 रोजीचे रात्रीचे जेवण, दि.2 जानेवारी ते 4 जानेवारी 2026या तीन दिवसांसाठी दुपार, रात्रीचे जेवण अशी एकूण 7 वेळेस जेवणाची व्यवस्था संमेलनस्थळी करण्यात येईल. तसेच संमेलनस्थळी दि. 2 जानेवारी 2026 ते 4 जानेवारी 2026 या तीन दिवसांसाठी रोज सकाळी चहा- नाष्ट्याची व्यवस्था करण्यात येईल. जेवण व नाष्ट्याची वेळ आयोजकांमार्फत कळवण्यात येईल .
अनिवासी प्रतिनिधींसाठी 1 जानेवारी 2026 रोजीचे रात्रीचे जेवण व दि. 2 जानेवारी ते जानेवारी 2026या तीन दिवसांसाठी दुपार व रात्रीचे जेवण अशी एकूण 7 वेळेस जेवणाची व्यवस्था संमेलन स्थळी करण्यात येईल. तसेच संमेलन स्थळी दि. 2 जानेवारी 2026 ते 4 जानेवारी 2026 या तीन दिवसांसाठी रोज सकाळी चहा- नाष्ट्याची व्यवस्था करण्यात येईल. याकरता अनिवासी नोंदणी करणार्या प्रतिनिधींनी शुल्क निवासी प्रतिनिधीपेक्षा वेगळे असेल. शुल्क वर नमूद केलेल्या बँक खात्यामध्ये भरणे आवश्यक राहील. जेवण व नाष्ट्याची वेळ आयोजकांमार्फत कळवण्यात येईल. जेवण / नाष्ट्याची कुपन्स आयोजकांकडून प्रतिनिधींना दिली जातील. एका अर्जावर एकाच व्यक्तीची नोंदणी केली जाईल. प्रतिनिधीच्या मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे इत्यादीची जबाबदारी त्यांच्यावरच राहील. निवास व्यवस्थेमध्ये नोंदणीकृत प्रतिनिधी व्यतिरिक्त इतर कोणालाही राहता येणार नाही. प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य, यानुसार प्रतिनिधींसाठी आयोजकांनी आरक्षित केलेली निवास व्यवस्था उपलब्ध राहील. निवासाच्या ठिकाणी प्रतिनिधींना चहा, नाष्टा, जेवणाची व्यवस्था असणार नाही. अशी किंवा इतर कोणतीही व्यवस्था स्व:खर्चाने करावी लागेल, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

