काँग्रेसमधील वादामुळे विधानपरिषद उमेदवारांच्या अंतिम यादीला विलंब

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, मुंबई, दि.४: दलित उमेदवारावरुन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरु असलेल्या वादामुळे महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या उमेदवारीसाठीची काँग्रेस पक्षाची यादी मागे घेण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

राज्यात सध्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या १२ रिक्त जागा आहेत. यासाठी महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष म्हणजे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस हे पक्ष प्रत्येकी चार उमेदवार देणार आहेत. संविधानातील कलम १७१ नुसार, साहित्य, विज्ञान, कला, सहकार चळवळ आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रातील ज्ञान असलेल्या किंवा प्रत्यक्ष अनुभव असलेल्या लोकांना विधानपरिषद आमदार म्हणून नियुक्त करु शकतात. दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपले चार उमेदवार निश्चित केले आहेत. मात्र, काँग्रेसची यादी अद्याप अंतिम होत नाही. काँग्रेसची तीन नावं निश्चित झाली आहेत. यामध्ये रजनी पाटील, सचिन सावंत आणि मुझफ्फर हुसेन यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र, चौथ्या उमेदवारासाठी वरिष्ठ काँग्रेस नेत्यांमध्ये वाद सुरु असल्याचे कळते.

काँग्रेसच्या पदाधिका-यांच्या माहितीनुसार, पक्षाच्या हायकमांडने राज्य काँग्रेसने सुचवलेल्या नावांवर शिक्कामोर्तब केलं आहे. मात्र, दलित नेते राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी कलाकार अनिरुद्ध धोंडुजी वानकर यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. वानकर यांनी गेल्या वर्षी वंचित बहुजन आघाडीकडून चंद्रपूर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.

दलित नेत्यांनी काँग्रेसच्या हायकमांडला वानकर यांच्या नावाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. कारण ते पक्षाबाहेरचे उमेदवार असून सतत पक्ष बदलत असतात. वंचित बहुजन आघाडीत जाण्यापूर्वी त्यांनी बसपत गेल्याचाही दावा या नेत्यांनी केला आहे. तसेच या दलित नेत्यांनी पक्षाला इशाराही दिला आहे की, पक्षाने केवळ पक्षनिष्ठ उमेदवार द्यावा अन्यथा त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले गेल्यास राजीनामा देण्याची धमकीही त्यांनी दिली आहे.

वानकर यांच्या उमेदवारीची शिफारस ही माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रमुख नितीन राऊत यांनी राजेंद्र करवडे आणि रमेश बागवे यांची नावं सुचवली आहेत. दरम्यान, काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील आणि प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडून याबाबत पक्षाचा फिडबॅक मागवला असून आणखी काही नावे सुचवण्यास सांगितले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!