
दैनिक स्थैर्य । दि. 17 जुलै 2025 । फलटण । आगामी स्थानिक स्वराज्य संस्था अर्थात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूकीमध्ये फलटण तालुक्यातील स्थानिकांना सर्वच राजकीय पक्षांनी तिकीट दिले पाहिजे. जर स्थानिक सोडून इतर जिल्ह्यातून आलेल्यांना तिकीट दिले तर त्याच्या विरोधात गट – तट न बघता स्थानिक म्हणून सर्वच राजकीय पक्षांनी एकत्रित येणे गरजेचे आहे. इतर जिल्ह्यातून आलेल्यांना निवडणूकीत पराभूत करुनच स्थानिकांना न्याय मिळेल, असे मत फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले आहे.
याबाबतचे मत श्रीमंत विश्वजीतराजे यांनी त्यांच्या व्हॉटस्अॅप स्टेटसद्वारे व्यक्त केले आहे.
फलटण तालुक्यातील आमचा राजे गट असो किंवा विरोधकांचा कोणताही पक्ष असो. स्थानिक म्हणून सर्वांनी एकत्र येवून साथ देत आवाज उठवणे गरजेचे आहे. अन्यथा ही परंपरा होईल व इतर जिल्ह्यातील आपल्या तालुक्यात येवून निवडणूका लढवतील. भावकी, नातेसंबंध आणि मित्र परिवार असे सर्व स्थानिकांनी एकत्र येवून आपल्या स्थानिकांनाच निवडून देणे गरजेचे आहे, अशा भावनाही श्रीमंत विश्वजीतराजे यांनी आपल्या व्हॉटस्अॅप स्टेटसद्वारे व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, युवा नेते तथा सातारा जिल्हा बँकेचे संचालक श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांचे सुपुत्र श्रीमंत धीरेंद्रराजे खर्डेकर यांचे नाव जिल्हा परिषद निवडणूकीच्या अनुषंगाने चर्चेत आले असून श्रीमंत विश्वजीतराजे यांच्या या व्हॉटस्अॅप स्टेटसचा रोख श्रीमंत धीरेंद्रराजे यांच्याच दिशेने असल्याची चर्चा रंगू लागली आहे.