अपुर्‍या माहितीच्या आधारे संजय भोसलेंकडून महिला अधिकार्‍यांची बदनामी : बी. एस. माने

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, दहिवडी, दि.११: ‘अपूर्ण माहितीच्या आधारावर महिला अधिकार्‍यांची बदनामी करण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न संजय भोसले यांचा सुरू आहे. संबंधित वाहनावर कारवाई सुरू असून, ते वाहन प्रशासनाच्या ताब्यात आहे,’ अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे माणच्या तहसीलदार बाई माने यांनी दिली.

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय भोसले यांनी शुक्रवारी (दि. 9) पत्रकार परिषद घेऊन प्रशासनावर आरोप केले होते. त्याच्या बातम्या विविध दैनिकात प्रसिद्ध झाल्या. त्या आरोपांचे खंडन आज माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, तहसील कार्यालयातून अवैधपणे वाळू वाहतूक करतानाची पकडलेली वाहने कोणतीच कारवाई न करता सोडल्याबाबत बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तथापि, वाहन क्र. (एमएच 11 ए एल 5328) या वाहनावर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 47 व 48 नुसार या कार्यालयाकडून कारवाई सुरू आहे. भोसले यांनी या कार्यालयातून फक्त सदर वाहनावर कारवाईचे दरम्यान केलेला पंचनामा, जबाब व अहवाल एवढ्या कागदपत्रांची नक्कल मागणी केली होती व ती त्यांना देण्यात आली होती.

तथापि, या कार्यालयाकडून सदर वाहनावर कोणती कारवाई करण्यात आली. याची कोणतीही माहिती न घेता अपूर्ण कागदपत्रांच्या आधारे महिला तहसीलदार व महिला प्रांताधिकारी यांची हेतुपुरस्पर बदनामी करण्याच्या अनुषंगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे.

सदर वाहन मालकाला या कार्यालयाकडून दंडात्मक आदेश बजावण्यात आला असून, या वसुलीच्या अनुषंगाने नियमानुसार नोटीस देण्यात आल्या आहेत व वसुलीची कारवाई सुरू आहे. तथापि, सदर वाहन हे महसूल खात्याच्या ताब्यात असताना व त्यावर कारवाई प्रस्तावित असताना देखील महिला अधिकार्‍यांचे मनोबल खच्चीकरण करणे, मानसिक त्रास देणे व हेतुपुरस्सर बदनामी करण्यासाठी प्रयत्न करून वरिष्ठ अधिकारी व जन माणसात आमची प्रतिमा मलिन करण्यासाठी जाणीवपूर्वक सदर कारवाईच्या अनुषंगाने आमची बदली झाल्यानंतर केली आहे. माझ्याकडे तहसीलदार पदाचा पदभार असेपर्यंत कोणतीही विचारणा अथवा कारवाईबाबत माहिती मागीतली नाही.

तसेच छावणीचे देयक छावणी चालकांना देताना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर तत्काळ उपविभागिय अधिकारी यांचे कार्यालयाकडे पाठवण्यात आल्या आहेत. सदर कोणताही विलंब, दिरंगाई या कार्यालयाकडून झालेली नाही. नाहक त्रास देण्याचे उद्देशाने व महिला अधिकारी असल्याने बदली झाल्यानंतर वरिष्ठ अधिकारी व जन माणसात आमची प्रतिमा मलिन करण्याच्या अनुषंगाने सदर पत्रकबाजी सुरू असून, सदर हेतुपुरस्पर बदनामी केल्याचे अनुषंगाने भविष्यात राज्य महिला आयोग व उचित न्यायालयात दाद मागणार असल्याचे बी. एस. माने यांनी सांगितले. तसेच आमच्या वैयक्तिक व्हॉट्सअ‍ॅपवर मागील दीड महिन्यांपासून मेसेज करून आमचे मनोबल खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

तसेच प्रसिद्ध झालेल्या बातमीत महसूल विभागाने बनावट कागदपत्रे तयार करून म्हसवड पोलीस ठाण्यातून वाळूच्या गाड्या सोडण्यात आल्याची प्रकरणामध्ये महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांची नावे तपासात पोलिसांनी गोवली असल्याबाबत उल्लेख केला आहे तरी सदर प्रकरण हे कोणते व कधीचे याबाबत आम्हाला कोणतीही माहिती नसून माझ्या कार्यकाळात अशा प्रकारचे कोणतेही प्रकरण झालेले नाही. त्यामुळे यातूनही हेतुपुरस्पर माझी बदनामी केली असल्याचे निदर्शनास येत आहे, असे माने यांनी म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!