
स्थैर्य, सातारा, दि. 3 नोव्हेंबर : महाबळेश्वर तालुक्यातील आणि हिंदवी स्वराज्याच्या तेजस्वी इतिहासाचे प्रतीक असलेल्या ऐतिहासिक प्रतापगडावर यंदा ’आई भवानी मातेचा त्रिपुरारी पौर्णिमा दीपोत्सव’ मोठ्या भक्तिभावाने पार पडणार आहे. हा सोहळा दि. 5 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 7 वाजता प्रतापगडावर होणार असून, त्यासाठी गड परिसर सज्ज झाला आहे.
हा कार्यक्रम श्री भवानी देवी संस्थान किल्ले प्रतापगड आणि सेवेकरी ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे. छत्रपती घराण्याच्या प्रेरणेने होत असलेला हा सोहळा भक्ती, परंपरा आणि इतिहास यांचा सुंदर संगम ठरणार आहे.कार्यक्रमात भवानी मातेच्या मंदिरात विशेष पूजा, आरती आणि दीपदान होणार असून, संपूर्ण गड हजारो दिव्यांच्या प्रकाशात उजळून निघेल. जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी संपूर्ण प्रतापगड दुमदुमणार आहे. पर्यटक, सेवेकरी आणि भक्तांची मोठी गर्दी अपेक्षित आहेया दीपोत्सवाचे मार्गदर्शन छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती राणीसाहेब दमयंतीराजे भोसले यांच्या प्रेरणेने करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रतापगड म्हणजे शौर्य, श्रद्धा आणि इतिहासाचा जिवंत वारसा. इथेच छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या कृपेने स्वराज्याचा ध्वज फडकावला होता. या दीपोत्सवामुळे त्या गौरवशाली परंपरेची आठवण पुन्हा जागी होणार आहे.आयोजक मंडळाच्या वतीने सर्व भवानी माता भक्त, शिवभक्त, सेवेकरी आणि पर्यटकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी दीपोत्सवाच्या या पवित्र क्षणी गडावर उपस्थित राहावे आणि जय भवानी, जय शिवाजी च्या जयघोषाने संपूर्ण प्रतापगड उजळवावा.हा दीपोत्सव केवळ धार्मिक सोहळा नसून, स्वराज्याच्या तेजस्वी परंपरेचे स्मरण आणि भक्तीचा उत्सव ठरणार आहे.

