दैनिक स्थैर्य | दि. १६ नोव्हेंबर २०२४ | फलटण | ‘‘गेल्या 15 वर्षात आ.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्त्वात श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या बरोबरीने मतदारासंघाच्या सर्वांगीण विकासात आमदार दीपक चव्हाण यांचा सहभाग आहे. राजे गटाच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघात सर्वतोपरी विकास झालेला आहे. हा विकास असाच सुरु ठेवण्यासाठी मतदारांनी चौथ्यांदा त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास टाकावा’’, असे आवाहन फलटण पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून आमदार दीपक चव्हाण सलग चौथ्यांदा निवडणूक लढवत असून त्यांच्या प्रचारार्थ श्रीमंत विश्वजीतराजे यांचा ‘गाव भेट दौरा’ सुरु आहे. सदर दौर्याअंतर्गत नुकतीच त्यांनी झिरपवाडी, सासकल, काळज, डोंबाळवाडी, कापडगाव, चांभारवाडी ,सस्तेवाडी, बरड (बागेवाडी) या गावांमध्ये भेट देवून पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांशी संवाद साधला.
यावेळी श्रीमंत विश्वजीतराजे म्हणाले, ‘‘श्रीमंत रामराजे यांनी गेली 30 वर्षे तालुक्याच्या विकासासाठी कष्ट घेतले आहेत. तालुक्यात पाणी आणून शेतकर्यांची शिवारं फुलवली आहेत. त्याच पाण्याच्या जिवावर तालुक्यात दोन वरुन चार साखर कारखाने उभे राहिले आहेत. साखरवाडीचा बंद पडलेला कारखाना श्रीमंत रामराजेंनी लक्ष घातल्यामुळे सुरु झाला. तिथल्या कामगारांच्या हाताला पुन्हा रोजगार मिळाला. शेतकर्यांची थकीत देणी मिळाली. आमची वृत्ती उद्योगधंदे बंद पाडण्याची नसून ते सुरु ठेवण्याची आणि वाढवण्याची आहे. या उलट समोरचे विरोधक तालुक्यातील मोठ्या कंपनीला कुलूप लावायची भाषा करीत आहेत’’, अशी टिकाही श्रीमंत विश्वजीतराजे यांनी यावेळी केली.
‘‘आमदार दीपक चव्हाणांवर आरोप करण्यासारखे काहीच नसल्याने त्यांच्या कार्यक्षमतेविरोधात खोटा आरोप विरोधक करत आहेत. स्वच्छ प्रतिमेचे, सुशिक्षीत आमदार, विधानसभेत सर्वाधिक प्रश्न विचारणारे आमदार अशी दीपक चव्हाण यांची ख्याती आहे. आ.श्रीमंत रामराजे यांच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याचे काम केले असून त्याकरिता त्यांना आपल्याला पुन्हा एकदा निवडून देवून विजयी चौकार मारायचा आहे’’, असेही श्रीमंत विश्वजीतराजे यांनी यावेळी सांगितले.