दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | पिंपोडे | ‘‘ काही जण म्हणतात फलटणला एखादा तिनदा आमदार होतो; चौथ्यांदा होत नाही. पण कोरेगांवला चौथ्यांदा आमदार होतो. त्यामुळे उत्तर कोरेगावच्या जनतेमुळे दीपक चव्हाण यांना विजयी चौकार मारण्याची संधी मिळणार आहे’’, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.
फलटण – कोरेगांव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी पुरस्कृत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार दीपक चव्हाण यांच्या प्रचारार्थ पिंपोडे बु.॥ (ता.कोरेगांव) येथे आयोजित जाहीर सभेत श्रीमंत संजीवराजे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार दीपक चव्हाण यांच्यासह फलटण व उत्तर कोरेगांव येथील महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
दीपक चव्हाण उमेदवार म्हणून उभे असताना त्यांच्या वागणूकीमध्ये काही फरक जाणवतोय कां?
श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले, ‘‘15 वर्षांपूर्वी झालेल्या मतदारसंघ पुर्नरचनेत कोरेगांव तालुका तीन मतदारसंघात विभागला गेला. या तालुक्यातील सर्वात जागृत भाग असलेला उत्तर कोरेगाव फलटणला जोडला गेला. त्यावेळी आपला हा नवखा उमेदवार कशा पद्धतीने काम करेल? हा प्रश्न आपल्या सगळ्यांच्याच मनात होता. आता या गोष्टीला 15 वर्षांचा काळ उलटला आहे. 15 वर्षानंतर चौथ्यांदा दीपक चव्हाण उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभे असताना आपल्याला त्यांच्या वागणूकीमध्ये काही फरक जाणवतोय कां? हा माझा प्रश्न आहे. कुणी साधा सरपंच, सभापती, जिल्हाध्यक्ष झाला तरी त्याला स्वर्ग दोन बोटं राहतो. इथंतर आमदारांना मुंबईची हवा आहे. ती लोखंडालाही गंज लावते. परंतू तुमचा हा लोकप्रतिनिधी जसाच्या तसा राहिला आहे; त्यामुळे आपण चौथ्यांदा त्यांना उमेदवारी दिली आहे.’’
कार्यक्षम आमदार म्हणून दीपक चव्हाण यांनी विधानसभेत ख्याती
‘‘सर्वसामान्यांचे सर्वाधिक प्रश्न मांडणारा कार्यक्षम आमदार म्हणून दीपक चव्हाण यांनी विधानसभेत ख्याती मिळवलेली आहे. सातारा जिल्ह्यातून सर्वाधिक प्रश्न विचारणारा आमदार कोण? यामध्ये दीपक चव्हाण यांच नाव घेतलं जातं. चांगली आणि कार्यक्षम व्यक्ती असा दुहेरी संगम असलेला लोकप्रतिनिधी आपल्याला मिळाला आहे. त्यामुळे गेल्या 15 वर्षांपासून आपलं नेतृत्त्व करणार्या दीपक चव्हाण यांना विक्रमी मतांनी आपल्याला विजयी करायचे आहे’’, असेही आवाहन श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी केले.
‘‘पक्ष तोडा – फोडीचे, दहशतीचे राजकारण आज सुरु आहे. पक्ष चोरण्याचे राजकारण आपण कधी पाहिले नाही. हे थांबवण्यासाठी शरद पवार ठामपणे उभे आहेत. त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी’’, असेही श्रीमंत संजीवराजे यांनी यावेळी नमूद केले.