फलटणमधील पोलिसांच्या गैरकारभाराची सखोल चौकशी करा – श्रीमंत रघुनाथराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. १९ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण शहरामध्ये गुन्हेगारीसंदर्भात काही प्रश्न ऐरणीवर आलेले आहेत. शहरात चक्री, भिंगरी, आयपीएल असे प्रकार खूप वाढलेले आहेत. इंगळे नावाच्या कुटुंबाचे ऑनलाईन फसवणुकीत ३ लाख रूपये एका तासात गेले आहेत. अशी फसवणूक शहरात वाढलेली आहे. फसवणूक झालेली अशी कितीतरी कुटुंबे शहरात आहेत, मात्र ती समोर येत नाहीत. ही गोष्ट पोलिसांना माहिती नाही, असे नाही. ही गुन्हेगारीत लोक वाट्टेल तेवढे पैसे/हप्ते पोलिसांना देत आहेत. पोलीस मात्र याबाबत गप्प आहेत. इतकेच नव्हे तर महाराष्ट्रभर गाजत असलेले ललित पाटील प्रकरण जे केमिकल ड्रग्जच्या बाबतीत आहे, त्या ‘इंजेटीव्ह ड्रग्ज’चा फलटण शहरात सुळसुळाट आहे. विमानतळावर याच्या भरमसाठ सुया पडलेल्या आहेत आणि हा प्रकार पोलिसांना माहीत नाही, असे असू शकत नाही, असा घणाघात पोलीस प्रशासनावर आज श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, फलटण पोलिसांच्या या गैरकारभाराची सखोल चौकशी पोलीस अधीक्षक समीर शेख व पोलीस उपअधीक्षक आँचल दलाल या अधिकार्‍यांनी करावी, अशी आमची मागणी आहे.

फलटण पोलिसांच्या कारभाराबाबत बोलताना श्रीमंत रघुनाथराजे पुढे म्हणाले की, फलटण येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात नागरिकांना अत्यंत हीन दर्जाची वागणूक मिळत असून येथे नागरिकांना शिवीगाळही होत आहे. तसेच या कार्यालयात तोडपाणी करण्याचे प्रकार वाढले असून यावर वरिष्ठ पातळीवरून कारवाई होणे गरजेचे आहे. हीन वागणुकीबाबत येथील पोलीस उपअधीक्षकांना व स्टाफला समज देणे गरजेचे आहे. फलटणसारखे सुसंस्कृत शहर अशाप्रकारच्या प्रशासकीय गलथानपणात भरडलं जावं, हे बरोबर नाही.

श्रीमंत रघुनाथराजे पुढे म्हणाले की, फलटणमधील प्रशासनातील सर्वच अधिकार्‍यांना मी दोष देत नाही. फलटणचे प्रांताधिकारी व तहसीलदार हे चांगले काम करत आहेत. त्यांना फोन केला किंवा मेसेज केला तर त्यास ते रिप्लाय देत असतात, हा जनतेचा अनुभव आहे. ज्याप्रमाणे पोलीस उपअधीक्षक लोकांना शिव्या देत आहेत हे कानावर येत आहे, त्याप्रमाणे प्रांत व तहसीलदार हे चांगले काम करत आहेत, हेदेखील ऐकायला मिळत आहे.

पोलीस अधीक्षक समीर शेख व पोलीस उपअधीक्षक आँचल दलाल यांनी फलटण पोलिसांच्या गैरकारभाराची चौकशी करावी व फलटण शहरात सुळसुळाट झालेल्या ‘इंजेटीव्ह ड्रग्ज’च्या प्रकरणाचा छडा लावावा, असे आमचे म्हणणे आहे, असेही शेवटी श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटले आहे.


Back to top button
Don`t copy text!