
दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२१ | सातारा | आपल्या सातारा शहराचं नाक म्हणून पोवई नाक्याची ख्याती आणि ओळख आहे. पोवई नाका अर्थात छ. शिवाजी महाराज सर्कल येथे ग्रेड सेपरेटरचे काम पूर्ण झाल्यानंतर आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या ‘राजधानी सातारा’ या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण मंगळवार दि. ९ रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे.
प्रत्येक शहराची एक खास ओळख असते. सातारा शहर हे तर ऐतिहासिक शहर असून पोवई नाका हे सातारा शहराचे महत्वाचे ठिकाण मानले जाते. याच पोवई नाक्यावर आठ रस्ते एकत्र येतात आणि कराड, कोरेगाव, माण, फलटण, खंडाळा, वाई, महाबळेश्वर तालुक्यातून याच ठिकाणी प्रथम प्रवेश होतो. त्यामुळे पोवई नाक्याला ऐतिहासिक आणि विशिष्ट स्थानिक असे महत्व आहे. याच ऐतिहासिक पोवई नाक्यावर आ. शिवेंद्रसिंहराजे आणि सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या संकल्पनेतून आणि स्वखर्चातून भारदस्त आणि आकर्षक अशा सेल्फी पॉईंटची उभारणी करण्यात आली आहे. या सेल्फी पॉईंटचे लोकार्पण मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या हस्ते आणि आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले जाणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ऐतिहासिक सातारा शहराच्या सौन्दर्यात भर टाकणाऱ्या या सेल्फी पॉईंटचे बांधकाम करताना इतिहासकालीन ‘टच’ देण्यात आला आहे. एखाद्या ऐतिहासिक वास्तूला साजेशे बांधकाम करण्यात आल्याने हा सेल्फी पॉईंट जिल्हावासीयांसह पर्यटकांचे खास आकर्षण राहणार आहे. या सेल्फी पॉईंटच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.