स्थैर्य, कलेढोण, दि. 01 : 14 वा वित्त आयोग व आमदार फंडातून साकारलेल्या कलेढोण ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा आ. जयकुमार गोरे यांच्या हस्ते व हणमंतराव साळुंखे पतसंस्थेचे चेअरमन संजीव साळुंखे, सरपंच भास्कर खरात व उपसरपंच विजय जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या सकाळी 11 वाजता होणार आहे.
कलेढोण ग्रामपंचायतीच्या स्थापनेपासून ग्रामपंचायतीला स्व-मालकीची इमारत उपलब्ध नसल्याने ग्रामदैवत असणार्या हनुमान मंदिराच्या वरील लाकडी इमारतीतूनच गाव कारभार पहिला जायचा. 14 व्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध झाल्याने व आ. जयकुमार गोरे यांच्या स्थानिक विकास निधीतून भव्य अशी दुमजली इमारत साकारण्यात आली आहे.
या इमारतीत तलाठी कार्यालय, पोस्ट कार्यालय, कृषी कार्यालय, वन विभागाचे कार्यालय तर पहिल्या मजल्यावर ग्रामपंचायतीचे सुसज्ज कार्यालय व बैठक कक्ष आहे. दुसर्या मजल्यावर सभागृह असून त्यास हणमंतराव साळुंखे सभागृह असे नाव देण्यात आले आहे. अनेक वर्षे नागरिकांची प्रलंबित असलेली मागणी पूर्ण झाल्याने ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत प्रशासनाचे विविध स्तरातून कौतुक होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.