स्थैर्य, कराड, दि. 25 : माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून येथील यशवंतराव चव्हाण बहुद्देशीय सभागृह येथे झालेल्या 50 बेडच्या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन गुरुवारी झाले. आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते, खा. श्रीनिवास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पणनमंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा लोकार्पण कार्यक्रम पार पडला.
कोरोना रुग्णांच्या संख्येप्रमाणे ऑक्सिजन वाटप झाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती करणार असल्याची माहिती आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी दिली. ते म्हणाले, कराड, मलकापूरला रुग्णवाहिका, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयासह अन्य कोरोना सेंटरसाठी 10 व्हेंटिलेटरची व्यवस्था व वारणा कोविडसाठी सहा लाखांचा निधी दिला आहे. आता या बहुद्देशीय केंद्रात कोविड सेंटरची उभारणी झाली आहे. तेथे वैद्यकीय सामग्रीची खरेदीही स्थानिक निधीतून करावी. कोरोनाशी दोन हात करताना सामान्यांना ऑक्सिजन मिळाला पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत.
ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण प्रयत्नातून झालेल्या या कोरोना सेंटरमध्ये सामान्यांची सोय होणार आहे. कोरोनाच्या काळात अशा केअर सेंटरची गरज आहे. ती ओळखून समाजातील अनेक घटक त्यासाठी पुढाकार घेत आहेत, ती अत्यंत चांगली गोष्ट आहे. अशी सकारात्मक स्थिती राहिल्यास कोरोनावर मात करणे शक्य होईल.
यावेळी खा. श्रीनिवास पाटील, डॉ. वैभव चव्हाण यांच्यासह मान्यवरांची भाषणे झाले. कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, परिविक्षाधीन मनीषा आवळे, डॉ. इंद्रजित मोहिते, अॅड. उदयसिंह पाटील, प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका वैद्यकीय अधिकारी संगीता देशमुख, कराडचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, मलकापूरच्या नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, नगरसेवक सौरभ पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य शंकरराव खबाले, पंचायत समिती सदस्य तसेच वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.