स्थैर्य, बीड, दि.22: पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या रुग्णवाहिकांचे पूजन करून आरोग्य विभागास आज सुपूर्द करण्यात आल्या.
आरोग्य विभागासाठी एकूण १५ रुग्णवाहिका प्राप्त झाल्या त्यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रांना ७ व जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अंतर्गत ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयांना ८ रुग्णवाहिका आज पालकमंत्री श्री. मुंडे यांच्या हस्ते देण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमासाठी आमदार संदीप क्षीरसागर,आमदार संजय दौंड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बजरंग सोनवणे, आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे ,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.आर. बी. पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यातील विशेषतः ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी आरोग्य यंत्रणेस आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यात येत असून पालक मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून या 15 रुग्णवाहिका जिल्ह्यात प्राप्त झाल्या आहेत. याचा जिल्हयातील गोरगरिब व गरजु रुग्णांना फायदा होणार असून वेळेवर वैद्यकीय सेवा व संदर्भ सेवा रुग्णांना मिळण्यास यामुळे मदत होईल.
जिल्हा रुग्णालय येथे आगमन झाल्यानंतर उपसंचालक डॉ.माले आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.साबळे यांनी पालकमंत्री श्री धनंजय मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .या कार्यक्रमास माजी आमदार सलीम सय्यद, माजी आमदार सुनील धांडे, सचिन मुळुक,कुंडलीक खांडे, राजकिशोर मोदी आदी मान्यवरांसह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्स आदी उपस्थित होते.
म्युकर मायकोसीस वॉर्डातील महिला रुग्णांची विचारपूस
पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी रुग्णवाहिका लोकार्पण कार्यक्रमानंतर जिल्हा रुग्णालयातील म्युकर मायकोसिस वर उपचार करण्यात येणाऱ्या वॉर्डाची पाहणी केली. यावेळी येथे उपचारासाठी दाखल असलेल्या महिला रुग्णांची विचारपूस केली आणि डॉक्टर्स, नर्स यांच्या बरोबर चर्चा करून माहिती घेतली. त्यांनी रुग्णांना आवश्यक वैद्यकीय उपचार तातडीने मिळण्याच्या दृष्टीने सूचना केल्या. सध्या येथे तीन महिला रुग्ण उपचारांसाठी दाखल आहेत.
जिल्ह्यातील रुग्णांचा सोयीच्या दृष्टीने अंबाजोगाई येथील स्वा.रा.ती. वैद्यकीय महाविद्यालय नंतर जिल्हा रुग्णालय बीड येथे उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यासाठी पालकमंत्री श्री.मुंडे यांनी जिल्हा प्रशासनास बीड जिल्हा रुग्णालयात या सुविधा निर्माण करण्यासाठी निर्देश दिले होते त्यादृष्टीने आवश्यक वैद्यकीय साधने सामग्री आणि यंत्रणा मागील काही दिवसात येथे कार्यान्वित करण्यात आली आहे.