स्थैर्य, सोलापूर, दि.5 : कुर्डूवाडी येथील बोबडे हॉस्पिटलमध्ये डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्यास जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी मान्यता दिली असून या सेंटरचे प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
कुर्डूवाडी शहरात कोरोनाची रूग्णसंख्या वाढत असल्याने डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरची आवश्यकता होती. डॉ. रोहित बोबडे यासाठी पुढे आले, त्यांनी आपल्या बोबडे हॉस्पिटलमध्ये सेंटर सुरू केले आहे. या सेंटरमध्ये 30 बेडची सोय असून यात 5 आयसीयू बेड आहेत. सध्या पाच कोरोनाचे रूग्ण उपचार घेत आहेत. यातील एक रूग्ण आयसीयूमध्ये तर चार रूग्ण सामान्य असल्याचे डॉ. बोबडे यांनी सांगितले.
या सेंटरमुळे माढा तालुक्यातील आणि कुर्डूवाडी शहरातील कोरोना रूग्णांची सोय होणार आहे, असे श्रीमती कदम म्हणाल्या.
रूग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी टेलेद्वारे समुपदेशन सुरू करणार आहोत. रूग्णांच्या आरोग्यासाठी प्राणायम, योगासने आणि संगीताची सोय दवाखान्यात करण्यात येणार आहे. प्रशासन सर्वतोपरी मदत करीत असल्याचे डॉ. बोबडे यांनी सांगितले.
उद्घाटन कार्यक्रमाला नगराध्यक्ष समीर मुलाणी, धनंजय डिकोळे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संतोष अडगळे यांच्यासह रूग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.