दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑक्टोबर २०२१ । फलटण । कोरोना महासाथीची शहराच्या डोक्यावरील टांगती तलवार काहीशी सौम्य होत असतानाच आता डेंग्यूचे हे आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांच्या चिंतेचे कारण ठरत आहे. जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात फलटण शहरासह तालुक्यामध्ये डेंग्यूचा संसर्ग लक्षणीय आहे. त्यामुळे नागरिकांना खबरदारीचे आवाहन करण्यात येत आहे. डेंग्यू हा स्वच्छ पाण्यात निर्माण होणाऱ्या डासांमार्फत पसरणारा आजार असल्याने डासांची उत्पत्ती रोखण्याचे आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर आहे.
फलटण शहरासह तालुक्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तीन महिने डेंग्यू रुग्णसंख्येचे महिने ठरत आहेत. आरोग्य विभागाने याबाबत माहिती दिली आहे. फलटण तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विक्रांत पोटे म्हणाले कि, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे अहवाल संसर्ग दर्शवत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून डास प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत, मात्र नागरिकांनी वैयक्तिक स्तरावर विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. ताप, अंगदुखी, डोके दुखी, अंगावर लाल चट्टे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच, घर आणि परिसरात स्वच्छ पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्या. साठवून ठेवलेले पाणी, बागेतील झाडांच्या कुंड्यांमध्ये साठलेले पाणी यांमध्ये होणारे डास डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होण्यास कारणीभूत ठरतात.
घराच्या गच्चीवर, पार्किंगमध्ये साठवलेले अडगळीचे सामान, टायर मध्ये साचलेले पाणीही डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीला हातभार लावते. त्यामुळे अधिकाधिक स्वच्छता राखणे हे डेंग्यूला थोपवण्याचे मार्ग असल्याचेही डॉ. पोटे यांनी स्पष्ट केले.
‘डेंग्यू’पासून बचावासाठी
- घर आणि परिसरात पाणी साठून राहणार नाही याकडे लक्ष द्या.
- अडगळीच्या जागा, गच्ची, वाहनतळ अशा ठिकाणी डासांची पैदास होत असल्यास आरोग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
- घरात डास प्रतिबंधक कॉईल, क्रीम यांचा वापर करा.
- दरवाजे आणि खिडक्यांना जाळ्या लावा.
- विषाणूजन्य आजाराचे लक्षण दिसल्यास परस्पर औषधे घेऊ नका.