
दैनिक स्थैर्य । दि. ०८ जानेवारी २०२३ । पुणे । बाजाराला शरण गेल्यामुळे सर्वच क्षेत्रात अधःपतन झाले असून राजकारण आणि पत्रकारिता हेही त्याला अपवाद नाहीत, असे प्रतिपादन राज्यसभेचे माजी माजी खासदार तसेच भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (आयसीसीआर) अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.
प्रसिद्ध पत्रकार, फूड ब्लॉगर आणि लेखक कै. आशिष चांदोरकर यांच्या स्मृतीनिमित्त आशिष चांदोरकर कुटुंबीय आणि मित्र परिवारातर्फे दरवर्षी विशेष व्याख्यान आयोजित करण्यात येणार आहे. या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना बदलते राजकारण, निवडणुका आणि पत्रकारिता या विषयावर डॉ. सहस्रबुद्धे बोलत होते. यावेळी कै. चांदोरकर यांच्या भगिनी अर्चना चांदोरकर आणि स्नेही योगेश ब्रह्मे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी महेश गोगटे लिखित ‘दि सॅक्रेड वॉटर्स ऑफ वाराणसी‘ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सहस्रबुद्धे यांच्या हस्ते झाले.
देशातील बदलत्या राजकारणावर भाष्य करताना डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, की आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा असं वाटलं की सर्व काही बदलेल. मात्र तसं काही न झाल्याची जाणीव पहिल्या 10 वर्षांमध्येच होऊ लागली. त्याचे पडसाद राजकारणात उमटले आणि त्याची छाया पत्रकारितेवरही पडली. त्यामुळेच अस्सल राजकारण किंवा अस्सल पत्रकारिता आता दुर्मिळ झाली आहे.
ते पुढे म्हणाले, की स्वातंत्र्याचा अर्थ केवळ ब्रिटिशांना घालवणे असा नव्हता. मात्र राज्य हे लोकांचे असते, लोकांनी निवडलेल्यांचे नाही, ही जाणीवच निर्माण झाली नाही. ते न उमजल्यामुळे स्वातंत्र्यानंतर उद्देशहीनता आली. या उद्देशहीनतेमुळे अवनती येण्याची सुरुवात पहिल्या 10 वर्षांतच झाली. यानंतर निवडून येणे हे एक तंत्र झाले आणि तंत्रामागच्या मंत्राचे विस्मरण झाले. आता तर राजकीय पक्ष स्थापन करणे हा एक प्रकारचा धंदा झाला असून राजकीय पक्ष हा इझी मनी मिळविण्याचा मार्ग झाला आहे.
गांभीर्याने निवडणूक लढविणारे जेमतेम १५० पक्ष असतील. मान्यताप्राप्त पक्ष तर केवळ सुमारे 50 आहेत, अशी माहिती देऊन ते म्हणाले, की निवडणुकीच्या मार्गाने अनेक दोष राजकारणात आले. आपल्या असण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व आहे, ही आपली मानसिकता झाली आहे. यामुळे बॅनर होर्डिंग्ज इत्यादींना महत्त्व आले आहे. यामुळे राजकारण आणि प्रतिष्ठा यात फारकत झाली असून राजकारणी म्हणजे लाचार व लंपट अशी प्रतिमा तयार झाली. राजकारण हाही परिवर्तनाचा मार्ग आहे, यावर श्रद्धा कमी झाली आहे आणि राजकीय पक्षांमध्ये सुभेदारी पद्धत सुरू झाली आहे.
ते पुढे म्हणाले, की आपल्या समाजाचा जेवढा वेळ निवडणुकांमध्ये जाती तेवढा प्रशासनाची गुणवत्ता वाढविण्यात जात नाही. आज कारसाठी परवाना लागतो मात्र सरकारसाठी लागत नाही ही शोकांतिका आहे. ही परिस्थिती जगात सर्वत्र आहे. राजकीय पक्षांच्या नोंदणीमध्ये गांभीर्य वाढविण्याची गरज असून त्यामुळे पक्षांमध्ये सक्रियता व उत्तरदायित्व येईल, असे सांगतानाच एक देश एक निवडणूक किंवा एक देश दोन निवडणुका अशा पर्यायांचा विचार करावा लागेल.
आजच्या पत्रकारितेवर भाष्य करताना डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, की कार्यकर्त्यांच्या अपेक्षा जशा राजकारणात बदलत गेल्या तशा वाचकांच्याही पत्रकारितेकडून बदलत गेल्या. बाजाराला शरण गेल्यामुळे सर्वच क्षेत्रात अधःपतन झाले आहे. या सर्व प्रक्रियेचा परिणाम आपल्या अभिमत निर्मिती प्रक्रियेवर झाला आहे. आजच्या माध्यमांमध्ये वृत्त आणि विचार यांची बेमालूम भेसळझालेली दिसते. हा वाचकांशी द्रोह आहे. दुर्दैवाने वाचक हाही मतदारांप्रमाणेच असंघटीत असल्यामुळे यावर उपाय दिसत नाही. वर्तमानपत्रे चांगल्याला चांगलं म्हणताना संकोच करतात. यातून अभिमत निर्माण न होता अश्रद्धा निर्माण होते, अशी टीका करतानाच महाविद्यालयांचे रँकिंग असते तसे वृत्तपत्रांचे रँकिंग असायला काय हरकत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला. पत्रकारितेतही सुधारणांची आवश्यकता आहे. अन्यथा लोकशाहीवर श्रद्धा टिकवून ठेवणे अवघड होईल. लोकशाहीची गुणवत्ता कायम राखण्याचे काम एकट्या पत्रकरितेतून होणार नाही. त्यासाठी सर्वांना मिळून प्रयत्न करावे लागतील. त्यात मतदार म्हणून आपलेही काही कर्तव्य आहे, असे ते म्हणाले.
रुखरुख लागून राहील
पत्रकार आणि फूड ब्लॉगर स्व. आशिष चांदोरकर यांच्याशी अधिक चांगली ओळख असायला हवी होती, अशी खंत व्यक्त करून डॉ. सहस्रबुद्धे म्हणाले, की अलीकडच्या काळात उत्कटतेने मैत्री होण्याची उदाहरणे कमी झाली आहेत. सध्याच्या बदललेल्या वातावरणात असा एक मित्र पुण्यात होता, हे त्यांच्या स्नेही व आप्तजनांकडून ऐकल्यानंतर त्यांना अधिक जवळून न भेटल्याची रुखरुख लागली आहे.