
स्थैर्य, फलटण, दि. २४ सप्टेंबर : संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाहून गेली असून, शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा पाणी अभ्यासक डॉ. शिवाजीराव गावडे यांनी केली आहे. राज्य सरकारची आर्थिक स्थिती पाहता, राज्यातील सर्व विधानसभा, विधान परिषद, लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांनी आपले एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करून शेतकऱ्यांना आधार द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
डॉ. गावडे यांनी निदर्शनास आणून दिले की, मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीची मदत अद्याप अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही. फलटण तालुक्यातील गोखळी येथे २०० बाधित शेतकऱ्यांपैकी केवळ १७ जणांना मदत मिळाली आहे, जे शासनाच्या उदासीनतेचे द्योतक आहे. त्यातच आताच्या अतिवृष्टीने, विशेषतः फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे शेतात गुडघाभर चिखल साचल्याने कापूस वेचणी अशक्य झाली आहे.
या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, विमा कंपन्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या सर्व पिकांचा विमा मोफत उतरवून त्याचा हप्ता शासनाने भरावा, अशी मागणीही डॉ. गावडे यांनी केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावे
फलटण, माण, खंडाळा आणि बारामती या तालुक्यांमध्ये कापूस पीक विमा योजना लागू नाही. ही योजना या भागातील शेतकऱ्यांसाठी तातडीने लागू करावी, अशी मागणी डॉ. शिवाजीराव गावडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, विधानपरिषद सदस्य श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व आमदार सचिन कांबळे-पाटील यांच्याकडे केली आहे.