दैनिक स्थैर्य । दि.१६ नोव्हेंबर २०२१ । सातारा । सातारा शहराच्या जलद कचरा निर्मूलनाला केंद्र सरकारने गौरवण्याचा निर्णय घेतला आहे . त्यामुळे कचरामुक्त शहर म्हणून सातारा शहरास पुरस्कार जाहीर झाला असून त्यासाठी दिल्ली येथे सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मुख्याधिकारी अभिजित बापट दि २० नोव्हेंबर रोजी दिल्लीला जाणार आहेत. ‘कचरामुक्त शहर’चा पुरस्कार जाहीर झाल्याने सातारा पालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
सातारा पालिकेचे विद्यमान पदाधिकारी नगराध्यक्षा माधवी कदम, उपाध्यक्ष मनोज शेंडे या दोघांच्याबरोबरच मुख्याधिकारी अभिजीत बापट हे शहर स्वच्छ कसे राहिल यासाठी वारंवार आरोग्य विभागास सूचना देत असतात. नागरिकांच्या ज्या ज्या मागण्या येतात त्यानुसार लगेच कार्यवाही केली जाते. हद्दवाढ झालेल्या भागाकडे प्राधान्यांने लक्ष दिले जात आहे. विशेष करुन मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी शहराचे नाव देशपातळीवर कसे येईल यादृष्टीने सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच आणि नियोजनामुळे केंद्रीय सर्व्हेक्षण पथकास सातारा शहर हे कचरामुक्त शहर आढळून आले. त्यामुळे शहराला पुरस्कार जाहीर झाला असून दि. 20 रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात होणाऱया पुरस्कार वितरण सोहळय़ास हजर राहण्याचे निमंत्रण दि. 10 रोजी मिळाले असून सातारा पालिकेचा तेथे सन्मान होणार आहे. या सोहळय़ाला सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट हे जाणार असून पुरस्काराचा स्वीकारणार करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे .