
स्थैर्य, खटाव, दि. 28 : वांझोळी (ता. खटाव) येथील ५४ वर्षीय पुरुषास कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रशासनाने आज कठोर उपाययोजना केली आहे. बाधित पुरुष हा विक्रोळी येथून वांझोळीला आला आहे.प्रशासनाने वांझोळी गाव व परिसर पूर्ण सील केले आहे. वांझोळी गाव 14 दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईतील विक्रोळी परिसरातून १८ मे रोजी सकाळी संबधित पुरुष आपल्या कुटुंबासहित वांझोळी येथे आला. त्यांचे बरोबरच आणखी दोन कुटुंब असे एकूण बारा जण वांझोळी येथे आले आहेत. 54 वर्षीय व्यक्तीस 25 तारखेला त्रास होऊ लागल्याने औषधोपचारासाठी पाठवले होते. त्या व्यक्तीची पत्नी व मुलगा यांनाही अलगीकरणासाठी दाखल केले आहे. संबंधित कुटुंबाबरोबर आलेले आणि दोन कुटुंबातील अशा सुमारे नऊ जणांना हायरिस्क कॉन्टॅक्ट म्हणून मायणी येथे संस्थात्मक अलगीकरणासाठी पाठवण्यात आले आहे.
प्रशासनाने याबाबत तत्काळ हालचाली करत उपाययोजना केल्या आहेत. सदर घटनेची माहिती मिळतात तहसीलदार अर्चना पाटील व महसूल विभागाचे कर्मचारी, तालुका वैद्यकीय अधिकारी युनूस शेख, डॉ.प्रियांका पाटील व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका, सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर व पोलीस कर्मचारी, उपसरपंच तानाजी मगर,पोलीस पाटील संभाजी माळी,तलाठी पी.एम.मोहिते, ग्रामसेवक यु.बी.नाळे आदींनी पुढील उपाय योजना करण्यासंदर्भात बैठक घेतली. तसेच प्रभावीत क्षेत्रात उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. ग्राम कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने गावातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते बंद केले आहेत. वैद्यकीय सेवा वगळता अन्य कारणांसाठी ग्रामस्थांना बाहेर पडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.