दैनिक स्थैर्य | दि. २६ नोव्हेंबर २०२३ | फलटण | रोहित वाकडे |
आजच्या काळात लोक संपत्तीला जीवापाड किंमत देतात. अनेक घरगुती कलहांच्या मागे संपत्तीच कारणीभूत असते. या संपत्तीसाठी मुलगा वडिलांचा वैरी होतो, भावा-भावात वैमनस्य निर्माण होते. याउलट आयुष्यभर कष्ट करुन उभारलेली, जपलेली संपत्ती आपल्या हयातीनंतर वारसांना न देता एखाद्या समाजोपयोगी कार्यासाठी विनामोबदला देऊन टाकणारे आधुनिक दानशूर कर्ण क्वचितच आढळतात. असाच दानशूरपणा फलटण येथील सेवानिवृत्त प्राध्यापक विक्रम आपटे यांनी दाखवून समाजाला एक आगळा वेगळा आदर्श घालून दिला आहे. आपल्या हयातीनंतर सध्या वास्तव्यास असलेला लाखमोलाचा ‘अलगुज’ बंगला त्यांनी एका सामाजिक संस्थेस देण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला. त्यांच्या या निर्णयाची सर्वत्र चर्चा होत आहे.
फलटणच्या मुधोजी महाविद्यालयात ३४ वर्षे सेवा बजावणारे प्रा.विक्रम आपटे हे ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद, वनवासी कल्याण आश्रम या संस्थांच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. शहरातील विद्यानगर या नामांकित परिसरात गेली ४१ वर्षे ते वास्तव्यास असून त्यांनी आपला ‘अलगुज’ बंगला आपल्या हयातीनंतर अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिकच्या फलटण केंद्राला विनामोबदला देण्याचे नुकतेच एका कार्यक्रमात घोषित केले.
‘मालमत्ता विकायची नाही’ हा पहिल्यापासूनचा मनोदय
प्रा. विक्रम आपटे यांच्या या दातृत्त्वाचे सर्वत्र कौतुक होत असून याविषयी ‘लोकजागर’शी बोलताना त्यांनी सांगितले की, “सन १९८२ पासून मी ‘अलगुज’ या माझ्या निवासस्थानी राहत आहे. माझी दोन्ही मुले परदेशात स्थिरस्थावर आहेत. आपल्या हयातीत आणि हयातीनंतरही आपली ही स्वकष्टार्जित मालमत्ता विकली जाऊ नये, अशी पहिल्यापासूनची इच्छा होती. ती नि:स्वार्थपणे काम करणार्या सामाजिक संस्थेला देण्याचा आपला मानस होता; पण कोणाला द्यायची हे आपण ठरवले नव्हते. शहरातील सामाजिक चळवळीवर आपण गेल्या काही वर्षांपासून लक्ष ठेवून होतो. नि:स्वार्थपणे काम करणारी संस्था असावी आणि त्या संस्थेला स्वत:ची जागा नसावी, अशा संस्थेच्या मी विशेषत: शोधात होतो.”
ब्राह्मण संघाची निवड का?
“फलटण शहरात आपल्याला अपेक्षित पद्धतीने काम करणार्या दोन – तीन संस्था नजरेसमोर होत्या. त्यामध्ये ब्राह्मण समाजासाठी कार्यरत असणार्या फलटण केंद्राचे कार्य आणि सेवाभाव आपल्याला विशेष भावला. शिवाय या केंद्राला अशा पद्धतीच्या मदतीची गरज असल्याचेही प्रकर्षाने जाणवले. मी या संस्थेचा ना पदाधिकारी; ना कार्यरत सदस्य; पण या संस्थेचे काम मी बारकाईने पाहिले. अखिल ब्राह्मण मध्यवर्स्ती संस्था, नाशिकच्या फलटण केंद्रामार्फत शहरात सामुदायिक मुंज, परशुराम पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, गरिब कुटुंबांना मदत असे समाजोपयोगी उपक्रम सातत्याने सुरू आहेत. त्यामुळे आपले दान या संस्थेच्या हाती देण्याचे आपण जाहीर केले”, असेही प्रा. विक्रम आपटे यांनी सांगितले.
मोठे दान आणि माफक अपेक्षा
इतका मोठा निर्णय घेताना आपण काही अटी, शर्ती ब्राह्मण संघासमोर ठेवल्या का? असे प्रा. आपटे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, “या मदतीमागे आपला अन्य कोणताही उद्देश नाही. माझ्या हयातीपर्यंत मी याच घरात राहणार असून हयातीनंतर ब्राह्मण संघाने माझ्या घराचे ‘अलगुज’ हे नाव बदलू नये; ते तसेच कायम ठेवावे. आणि संस्थेची तयारी असल्यास त्यांनी घराच्या वरच्या मजल्यावर सुसज्ज हॉलचे बांधकाम करावे. आणि सदर हॉलला माझी दिवंगत पत्नी ‘आरती’ हिचे नाव देऊन तिची स्मृती या वास्तूत चिरंतन जागृत ठेवावी, इतकीच माझी माफक अपेक्षा असून ती या संस्थेने मान्यही केली आहे.”
कुटुंबियांची संमती
वडिलांच्या मालमत्तेवर मुलं अधिकार सांगणार नाहीत तर नवल; असे असताना प्रा. विक्रम आपटे यांच्या मुलांनी व कुटुंबातील सदस्यांनी मात्र त्यांच्या या निर्णयाला बिनदिक्कत हिरवा कंदील दाखवला. याविषयी प्रा. आपटे यांनी सांगितले की, “माझी दोन्ही मुले परदेशात स्थिरस्थावर आहेत. फलटण येथील आपला बंगला मी कुणाला तरी दान देण्याच्या मानसिकतेत आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्यांनी कधीही यावर आक्षेप घेतला नाही वा स्वार्थ दाखवला नाही. माझ्या निर्णयाला पाठींबाच दिला आणि कौतुकही केले.”
प्रा. विक्रम आपटे यांच्याविषयी थोडक्यात…
प्रा. विक्रम आपटे हे फलटणच्या मुधोजी महाविद्यालयातील ‘इंग्रजी’ विषयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक आहेत. त्याआधी त्यांनी बेळगाव व निपाणी येथेही सेवा बजावली आहे. प्रा. आपटे यांना लेखन, संपादन व अनुवादाचा व्यासंग असून यातून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. भटकंतीची विशेष आवड असल्याने जगभरातील १८ देश त्यांनी पाहिले आहेत. ज्येष्ठ नागरिक संघ, महाराष्ट्र साहित्य परिषद फलटण शाखा, वनवासी कल्याण आश्रम या संस्थांच्या माध्यमातून ते आजही फलटण शहरात सामाजिक योगदान देत आहेत.