
स्थैर्य, तुळजापूर, दि.२८: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तुळजापुरातला चैत्री पौर्णिमा यात्रेपाठोपाठ नवरात्र महोत्सवही रद्द करण्यात आला आहे. मंदिर संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिका-यांनी संस्थानच्या बैठकीत हा निर्णय घेतला. यामुळे पुजारी वर्गासोबतच तुळजापूर शहरातील व्यावसायिकांच्या चिंतेत भर पडली आहे. गेल्या ६ महिन्यापासून तुळजाभवानी मंदिर बंद असल्याने अर्थिक अडचणीत सापडलेल्या शहरवासियांना मंदिर उघडण्याचे वेध लागले होते.
जागतिक महामारी कोरोनाचा फटका तुळजाभवानी मातेच्या वर्षातील सर्वात मोठा उत्सव शारदीय नवरात्र महोत्सवाला बसला आहे. गर्दी टाळण्यासाठी नवरात्र महोत्सव कालावधीत भाविकांना शहराबाहेरच अडविण्यात येणार आहे. कोरोनाचा पहिला फटका चैत्र पौर्णिमेला बसला होता. त्यानंतर उन्हाळा सुट्टी, लग्नसराई या कालावधीत मंदिर बंद असल्याने पुजारी, व्यावसायिकांचे आर्थिक नियोजन कोलमडले. सर्वांच्या आशा आगामी नवरात्र महोत्सवावर होत्या. मात्र, नवरात्र महोत्सवही भाविकांशिवाय होणार असल्याचे जाहीर करण्यात आल्याने पुजारी, व्यावसायिकांचे आर्थिक गणित धोक्यात आले आहे.