आवाजाच्या भिंतींना आंधळीत बंदीचा निर्णय


स्थैर्य, सातारा, दि. 13 डिसेंबर : सामाजिक वातावरण बिघडविणार्‍या आवाजाच्या भिंतींना यापुढे गावाच्या हद्दीत बंदी घालण्याचा ऐतिहासिक ठराव आंधळी (ता. माण) ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. हा ठराव कायदेशीर चौकटीत बसवून काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरपंच दादासाहेब काळे यांनी सांगितले.

ग्रामपंचायतीने शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम हाती घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेचा सर्वांगीण विकास करत जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट प्रगती करत दुसरा क्रमांक पटकावला आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सात घटक विषयांवर स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे.

आता गावातील वातावरण वेळोवेळी बिघडविणार्‍या आवाजाच्या भिंतींवर बंदी घालण्याचा विषय ग्रामसभेसमोर चर्चेला आला.
ध्वनिप्रदूषण, मर्यादा ओलांडून कर्णकर्कश आवाज, शारीरिक आणि मानसिक घातक दुष्परिणाम, नाचताना केले जाणारे अश्लील हावभाव, वादावादीमुळे आवाजाच्या भिंती धोकादायक ठरू लागल्या आहेत. आवाजाच्या भिंतींमुळे सामाजिक वातावरण बिघडत असून, त्यामुळे होणारे घातक दुष्परिणाम यावर साधकबाधक चर्चा झाली. अखेर सर्वानुमते ग्रामपंचायतीच्या हद्दीत कोणत्याही कार्यक्रमात आवाजाच्या भिंतींवर बंदी घालण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला.

आवाजाच्या भिंतींवर बंदीच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी प्रतिसाद दिल्याने आता आंधळी ग्रामपंचायतीच्या हद्दीत आवाजाच्या भिंतींना कायमची प्रवेश बंदी असणार आहे.

..दादासाहेब काळे,सरपंच, आंधळी (ता. माण)


Back to top button
Don`t copy text!