दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२३ | फलटण |
वाई-खंडाळा-महाबळेश्वरचे आमदार मकरंद पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात आले.
ाष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंडखोरी करून अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद व आठ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी आमदार मकरंद पाटील हे अजित पवार यांच्याबरोबर असल्याची माहिती समाजमाध्यमांवर व बातम्यांमध्ये येत होती. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. हा सगळा घटनाक्रम घडत असताना पक्षाध्यक्ष शरद पवार हे सोमवारी सातारा जिल्ह्यामध्ये आले होते. यावेळी आमदार पाटील यांनी स्वतः मतदारसंघाच्या आणि सातारा जिल्ह्याच्या सीमेवर त्यांचे स्वागत केले. पूर्ण दौर्यात ते त्यांच्याबरोबर होते. आज त्यांनी किसन वीर कारखान्यावर वाई-खंडाळा- महाबळेश्वर तालुक्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत शरद पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत मतदार संघातील प्रतापराव पवार, नितीन भरगुडे-पाटील, शशिकांत पिसाळ, बाबुराव सपकाळ, संजय गायकवाड आदींची भाषणे झाली. या बैठकीला बकाजीराव पाटील, दत्ता नाना ढमाळ,उदय कबुले, मनोज पवार, प्रमोद शिंदे, राजेंद्र राजपुरे, नितीन भिलारे, राजेंद्र तांबे, राजेंद्र अण्णा भिलारे, विमलताई पार्टे आदी अनेक समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.