अनेकदा कावळा गरुडाच्या मानेवर बसून त्याला उगीचच छेडत राहतो, टोचा मारत राहतो. कावळा मानेवर बसल्यावर गरुड बाकी काहीच करत नाही. आपली ताकद वाया न घालवता फक्त आपले पंख विस्तीर्ण फैलावतो आणि आकाशात उंच झेप घेतो. गरुड जितका उंच जातो तितका कावळ्याला श्वास घ्यायला त्रास होतो. एक ठराविक उंचीवर गेल्यावर श्वास घ्यायला त्रास झाला की गरुडाच्या मानेवर बसून टोचा मारणारा कावळा कासावीस होऊन खाली कोसळतो.
आयुष्यात प्रत्येक लढाई लढण्याची एक वेळ असते. आपल्याबद्दल गलिच्छ बोलणाऱ्या लोकांना आपल्या कर्तृत्वाने उत्तर देण्याची संधी आयुष्य आपल्याला अनेकदा देत असते. सतत चिखलात लोळणाऱ्या डुकरांशी सामना करायला चिखलात उतरायचं की त्या डुकरांना लोळायला चिखलच राहणार नाही हे पहायचं याची निवड आपली असते. शत्रू नेहमीच पाठीवर वार करण्यात माहिर असतो, त्याचा प्रत्येक हल्ला परतवून लावण्यात आपला वेळ आणि शक्ती वाया घालवायची की आपण आपल्या स्वतःवर मेहनत घेऊन आपल्या स्वतःला इतक्या उंचीवर नेऊन ठेवायचं की हे वार तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत याची निवड प्रत्येकाने स्वतःची स्वतः करायची असते.
मंदिरावर बसणारा गरुड नेहमी उंच आकाशात बघतो.तर कावळा नेहमी खाली बघतो. पक्ष्यांचा राजा गरुड पाऊस सुरु झाल्यावर जिथून पाऊस सुरु झाला त्याच्यावर जातो.
आपल्या पाल्यांना स्वावलंबी गरुड बनवा. काव काव करणारे डोमकावळे बनवू नका. तुकाराम महाराजांना वैकुंठगमनसाठी विष्णूसह गरुड आले होते. आपल्याला कावळा शिवला तर म्हणे मोक्ष मिळतो. बाकी आपण सूज्ञ जादा लेखन बरे नव्हे.