‘लोकराज्य’चा डिसेंबरचा अंक प्रकाशित

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०६ डिसेंबर २०२२ । मुंबई । भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित ‘लोकराज्य’चा विशेषांक प्रकाशित केला आहे.

या विशेषांकात विविध मान्यवरांनी आपल्या लेखातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याला उजाळा दिला आहे. यामध्ये प्रसिद्ध लेखक दत्ता भगत यांनी संविधान लेखकाचा उदय, डॉ. प्रदीप आगलावे यांनी डॉ. आंबेडरकरांचा राष्ट्रवाद, विवेक सौताडेकर यांनी चरित्र आणि विचारधन, डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. आंबेडकर यांची प्रेरक पत्रकारिता, प्रा. कुमुद पावडे यांनी स्त्री स्वातंत्र्याचे कैवारी, डॉ. किशोर जोगदंड यांनी डॉ. आंबेडकर एक इतिहासकार याविषयी लेखन केले आहे. शिवाय या अंकामध्ये डॉ. आंबेडकर यांचे पाली भाषेविषयी असलेले प्रेम अतुल भोसेकर यांनी मांडले आहे. कामगार चळवळीच्या माध्यमातून कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांच्यावरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी डॉ. आंबेडकर यांनी लढा देवून कामगारांना न्याय मिळवून दिल्याचे प्रा. डॉ. प्रवीण बनसोड यांनी कामगार चळवळ आणि डॉ. आंबेडकर या लेखातून मांडले आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महान योद्धे आणि संविधान सभेतील मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्धिक परिश्रमातून भारतीय संविधान घडविले. यातूनच भारताच्या आधुनिक राष्ट्राची पायाभरणी झाल्याचे प्रा. अनंत राऊत यांनी आपल्या लेखातून मांडले आहे.

याशिवाय लोकराज्यमध्ये जातप्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया, दिव्यांगांच्या शासकीय योजना, जलपर्यटन यासह राज्य शासनाने लोकोपयोगी घेतलेले निर्णय, योजनांची माहिती देण्यात आली आहे.

हा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच https://mahasamvad.in या पोर्टलवर वाचण्यासाठी मोफत उपलब्ध आहे.


Back to top button
Don`t copy text!