दैनिक स्थैर्य । दि.१० फेब्रुवारी २०२१ । फलटण । पुणे येथील श्रेयी इक्विपमेंट फायनान्स कंपनीच्या चौघांनी कर्जदारास थकीत हप्त्यापोटी चार चाकी गाडी आडवी मारून शिवीगाळ दमदाटी करत तातडीने एक लाख रुपये दे नाहीतर येथेच मारून टाकतो, अशी दमदाटी आणि धमकी दिल्याप्रकरणी फायनान्स कंपनीच्या चौघा जणांविरोधात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोसीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की, अनिल जगन्नाथ शिंदे, रा. मठाचीवाडी व त्यांचा मेहुणा रमेश बुधनवर यांनी पुणे येथील श्रेयी इक्विपमेंट फायनान्स कंपनीकडून 14 फेब्रुवारी 2020 रोजी 42 लाख 50 हजार रुपये पोकलेन मशीनसाठी कर्ज घेतले होते. यातील 13 हप्ते त्यांनी भरले होते. कोरोना परिस्थितीमुळे सात हफ्ते थकित असताना दिनांक नऊ फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास श्रेयी इक्विपमेंट फायनान्स पुणेचे अधिकारी अरिंदम आचार्य, पंकज गायकवाड व अनोळखी दोघेजण लाल रंगाच्या चारचाकी गाडीतून त्यांच्या घरी आले. तुमच्या नावावर कोर्टाचे वॉरंट असून तुम्हाला आमच्या सोबत पुण्याला यावे लागेल, असे सांगितले अनिल शिंदे यांनी मी माझ्या मोटरसायकल वर येतो तुम्ही पुढे व्हा. शिंदे हे मोटरसायकल सुरू करू लागले असता पंकज गायकवाड हा त्यांच्या पाठीमागे मोटरसायकलवर जबरदस्तीने बसला फलटण बाजूकडे ते येत असताना पिंपरद गावच्या हद्दीत विठू माऊली पेट्रोल पंपाजवळ त्यांच्या मोटरसायकलला चार चाकी गाडी आडवी मारून थांबवली.
गायकवाड यांनी त्यांच्या मोटरसायकलची चावी काढून घेतली व त्यांना त्यांच्या चारचाकीत जबरदस्तीने बसविले यावेळी पंकज गायकवाड याने तू आम्हाला ताबडतोब एक लाख रुपये दे नाहीतर तुला येथेच मारतो, अशी धमकी देऊन शिवीगाळ दमदाटी केली. त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोन अनोळखी इसमांनी धक्काबुक्की केली. त्यावेळी समोरुन शिंदे यांचे चुलते व त्यांच्यासोबत दोन व्यक्ती आल्याचे पाहून फायनान्स कंपनीचे चौघेजण फलटण बाजूकडे निघून गेले या घटनेची फिर्याद अनिल शिंदे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल रामदास लिमण करीत आहेत.
फलटण तालुक्यामध्ये खाजगी सावकार बरोबरच विविध खाजगी फायनान्स कंपन्यांची दादागिरी,दमदाटी सुरू असून जबरदस्तीने पैसे कर्जदाराकडून वसूल केले जात आहेत. त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असल्याने यापुढे जर कोणी कर्जदारांवर जबरदस्ती केली. तर फायनान्स कंपन्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकवू खाजगी सावकार व फायनान्स कंपन्यांची दमदाटी दादागिरी यापुढे सहन केली जाणार नाही, अशी प्रतिक्रिया सावकार फायनान्स व बचतगट विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अमीर शेख यांनी दिली.