दैनिक स्थैर्य । दि. ०३ ऑगस्ट २०२२ । खंडाळा। खंडाळा तालुक्यातील शिरवळ याठिकाणी घरगुती अडचणी व औषधोपचारासाठी व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही आणखी ९ लाख रुपये येणे बाकी असल्याचे सांगत शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेसह दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम कायद्यांतर्गत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आजपर्यंत शिरवळ पोलीस स्टेशनला सावकारी कायद्याअंतर्गत तीन गुन्हे दाखल झाले असून शिरवळ परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची शिरवळ पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी कि, शिरवळ ता.खंडाळा येथील न्यू कॉलनी याठिकाणी सविता रामदास कावळे (वय ३७) या कुटूंबियांसमवेत राहण्याकरिता आहे. दरम्यान, ६ मार्च २०२१ रोजी सविता कावळे यांचे पती व मुलगा हे कोरोनाबाधित झाल्याने सविता कावळे यांनी न्यू कॉलनी येथील सोहेल बागवान यांच्याकडून औषधोपचारासाठी २ लाख रुपये १५ टक्के व्याजाने घेतले होते. यावेळी १० एप्रिल २०२१ रोजी मुलीच्या औषधोपचाराकरिता व साडी व्यवसायकरिता पुन्हा ३ लाख रुपये व्याजाने सोहेल बागवान यांच्याकडून सविता कावळे यांनी घेतले होते. दरम्यान, २१ ऑक्टोबर २०२१ रोजी शिंदेवाडी येथील सविता कावळे यांचे मेहुणे सोमनाथ विठ्ठल सोनावणे यांनी त्यांच्या नावावर असलेल्या फंडातून दिलेले ४ लाख रुपये हे सविता कावळे यांनी मुद्दल म्हणून सोहेल बागवान याला दिले तर उर्वरित १ लाख रुपये हे १३ एप्रिल व ११ मे २०२२ रोजी देऊन पैशाची परतफेड केली आहे. दरम्यान, सोहेल बागवान हा व्याज व परतफेड करूनही ९ लाख रुपये राहिलेले आहेत, अशी मागणी करून पैश्याकरिता सोहेल बागवान व त्याची मावशी आलमा शौकत बागवान हि घरी येऊन सविता कावळे, मुलगी व मुलाला पैश्याकरिता शिवीगाळ व दमदाटी करीत असे. तर सोहेल बागवान याने मुलाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची फिर्याद सविता कावळे यांनी सोहेल बागवान व आलमा बागवान यांच्याविरुद्ध शिरवळ पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्याने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम कायद्यांतर्गत शिरवळ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात खळबळ उडाली आहे.या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल बारेला हे करीत आहे.