स्थैर्य, रायगड, 11 : दै. तरूण भारतचे माजी मुख्य संपादक, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी कार्यवाह, विदर्भ साहित्य संघाचे विद्यमान उपाध्यक्ष वामन तेलंग यांच्या निधनाने निरपेक्ष वृत्तीने काम करणाऱ्या एका ज्येष्ठ संपादक, साहित्यिकाला आपण मुकलो आहोत, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
अलीकडेच वामनरावांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा नागपुरात आयोजित करण्यात येणार होता. एक गौरविकाही काढण्याची तयारी सुरू होती. परंतू कोरोना प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम लांबणीवर पडला. वामनराव यांनी अनेक नवोदित लेखकांना घडविले, मोठे केले. समाजात सक्रिय राहून सुद्धा, त्यांच्यातील स्थितप्रज्ञ भाव वाखाणण्यासारखा होता. ललित लेखन, परखड समीक्षक, कथालेखन असे कितीतरी त्यांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाचे पैलू. त्यांच्या जाण्याने साहित्य परंपरेची मोठी हानी झाली आहे. विदर्भ साहित्य संघाने एक भक्कम आधारस्तंभ गमावला आहे. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांचे आप्तस्वकीय, चाहते यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी मी प्रार्थना करतो.