दैनिक स्थैर्य | दि. १० जुलै २०२३ | फलटण |
फलटण शहराच्या नारळीबाग परिसरातील पोतेकर कुटुंबातील पिता व पुत्राचा आयुर्वेदिक काढा पिल्यानंतर विषबाधा होऊन मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. सुदैवाने या घटनेतून पोतेकर यांची मुलगी बचावली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
या घटनेची अधिक माहिती अशी, फलटण शहरात असणार्या नारळीबाग परिसरात गजानन चौक येथे हणमंतराव पोतेकर (वय ५५) हे एक मुलगा, मुलगी व पत्नीसोबत राहत असून त्यांचा भाजीपाल्याचा व्यवसाय आहे. हणमंतराव पोतेकर यांचा मुलगा अमित (वय ३२) हा पुणे येथे बँकेत नोकरीला असून घराच्या बाहेर त्यांचे चहाचे दुकान आहे. शनिवारी सकाळी अमित हा सुट्टी असल्याने आपल्या घरी आला होता. त्यामुळे दुपारी मांसाहारी जेवण तर सायंकाळी गोड पोळ्याचे जेवण घरात बनविण्यात आले होते. संध्याकाळी जेवण झाल्यानंतर आयुर्वेदिक काढा सर्वांनी पिला. यावेळी काढा पित असताना हणमंतराव पोतेकर यांच्या मुलीला त्रास झाल्याने तिने थोडासाच काढा पिला.
काढा पिल्यानंतर हणमंतराव व अमित यांना त्रास सुरू झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोघांचा ़मृत्यू झाला. जेवणातून किंवा काढ्यातून त्यांना विषबाधा झाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.
शवविच्छेदनानंतर पोतेकर पिता-पुत्रावर दुपारी फलटणच्या स्मशानभूमी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दोघांचा व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून येत्या आठ दिवसात त्याचा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.