भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीताचं अपरिमित नुकसान – महसूल मंत्री बाळासाहेब थोरात


दैनिक स्थैर्य । दि.०६ फेब्रुवारी २०२२ । मुंबई । भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनाने भारतीय संगीताचं अपरिमित नुकसान झाले, या शब्दात जगद्विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

श्री. थोरात आपल्या शोकसंदेशात म्हणतात, भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. त्यांनी आजीवन संगीताची साधना केली. लता मंगेशकर यांनी 980 पेक्षा अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली असून, 20 हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. 2001 साली लता मंगेशकर यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांना 1989 मध्ये ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात आला होता. संगीत क्षेत्रात भारताचे नाव वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. संगीत साधनेतून जगभरात त्यांनी निर्माण केलेली कीर्ती त्यांच्या चाहत्यांच्या मनात कायम राहिल. त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात पोकळी निर्माण झाली असून संपूर्ण कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.


Back to top button
Don`t copy text!