स्थैर्य, फलटण, दि.११: आसू (ता.फलटण) येथील शिवराज स्वामीनाथ साबळे या 18 वर्षीय युवकाचा गुलियन बेरी सिंड्रोम म्हणजेच जीबीएस या व्हायरसमुळे मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे शिवराज साबळे याने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर यशस्वी मात केली होती.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, आसू येथील शिवराज स्वामीनाथ साबळे याला सुमारे एक महिन्यांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्याचा एचआरसीटी स्कोर फक्त 2 होत व तो कोरोनातून पुर्णपणे बरा देखील झाला होता. मात्र बरे झाल्यानंतर दिवसांनी त्याला अशक्तपणा येऊन अचानक प्रकृती खालावण्यास सुरुवात झाली. त्याला पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर जीबीएस व्हायरसची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले होते. माञ आज उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. शिवराजचे वडील स्वामीनाथ साबळे हे श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि आसूचे माजी सरपंच आहेत. त्याच्या पश्चात आई, वङील, भाऊ, आजी असा परिवार आहे. शिवराजच्या अकाली निधनाचे वृत्त कळताच आसू परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काय आहे गुलियन बेरी सिंड्रोम
गुलियन बेरी सिंड्रोम एक गंभीर स्वरुपाचा आजार आहे. विषाणूची लागण झाल्यानंतर हा आजार होतो. मात्र हा आजार एका व्यक्तीच्या माध्यमातून दुसर्या व्यक्तीला होत नाही. कोरोनावर मात केलेल्या काही व्यक्तींमध्ये या आधीही ’गुलियन बेरी सिंड्रोम’ची लक्षणं दिसून आली आहेत. यामुळे रुग्णांना अर्धांगवायूचा त्रास होतो. गुलियन बेरी सिंड्रोम दुर्मिळ आजार आहे. तो एक लाखामागे एका व्यक्तीला होतो. रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्यांना गुलियन बेरी सिंड्रोम होण्याची शक्यता अधिक असते. प्लाझ्मा फोरेसिस मशीनच्या माध्यमातून गुलियन बेरी सिंड्रोमवर उपचार केले जातात. योग्य वेळी उपचार न झाल्यास रुग्णाचा जीवदेखील जाऊ शकतो. गुलियन बेरी सिंड्रोमचा त्रास सुरू झाल्यावर सुरुवातीला हात, पायांमध्ये कमजोरी जाणवू लागते. त्यानंतर हळूहळू कंबर, खांदे दुखू लागतात. गुलियन बेरी सिंड्रोमचा त्रास वाढल्यास श्वास घेण्यात अडचणी येतात. रुग्णाला पाच-दिवस रोज एक इंट्राविनस इम्युनोग्लोबिलिन इंजेक्शन दिलं जातं. त्याची किंमत अतिशय जास्त आहे. दररोज व्यायाम, योग केल्यास, चालल्यास, पौष्टिक आहार घेतल्यास गुलियन बेरी सिंड्रोमपासून बचाव करता येतो.