स्थैर्य, फलटण दि.२: अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस फलटण शहर शाखेच्यावतीने फलटण नगर परिषदेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांचे पत्र मुख्याधिकार्यांना देण्यात आले असून त्यांची पूर्तता झाली नाही तर दि. 15 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
मागण्यांमध्ये प्रामुख्याने नगर परिषद सफाई कामगार वसाहतीमधील राहती घरे त्यांच्या नावावर करणेत यावीत, लाड व पागे कमिटीच्या शिफारशीनुसार शैक्षणिक पात्रतेनुसार पदोन्नती मिळावी, सफाई कामगारांचे पगार दरमहा 5 तारखेपूर्वी व्हावेत, निवृत्ती वेतन धारक सफाई कर्मचार्यांना त्यांचे निवृत्ती वेतन दरमहा 5 तारखेपूर्वी मिळावे, कोव्हिडं 19 अंतर्गत सफाई करणार्या कर्मचार्यांना जादा मानधन मिळावे वगैरे 10 मागण्या या पत्राद्वारे करण्यात आल्या असून पत्राची प्रत महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, नगराध्यक्षा सौ. नीताताई मिलिंद नेवसे यांना पाठविल्या आहेत.
संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू मारुडा, अध्यक्ष मनोज मारुडा, उपाध्यक्ष रमेश वाघेला, सचिव नितीन वाळा व अन्य पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांना वरील निवेदन देऊन सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्याची विनंती केली आहे.