गोंदवलेत शुक्रवारपासून श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा पुण्यतिथी महोत्सव


स्थैर्य, सातारा, दि. 1 डिसेंबर : श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांच्या 112 व्या पुण्यतिथी महोत्सवाला येत्या पाच डिसेंबरपासून (शुक्रवार) प्रारंभ होत आहे. ता. 14 डिसेंबरपर्यंत दहा दिवसीय महोत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांनी भक्तिरसात पार पडणार आहे. मंदिर परिसर, समाधिस्थान आणि परिसर भाविकांच्या गर्दीमुळे आणि तयारीच्या उल्हासामुळे उत्साहात न्हाऊन निघालाआहे.

या महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाच डिसेंबरला पहाटे ’श्रीं’ना रुद्राभिषेक व प्रातःपूजा होईल. सकाळी साडेसहा वाजता ’कोटी पूजनाने’ विधिवत सुरुवात होणार आहे. यावेळी धान्य पूजन, गोमाता पूजन, अग्निपूजन, ध्यान मंदिर येथे एक माळ जप व ’श्रीं’ची आरती व तीन श्लोक होतील. मुख्य समाधी मंदिरात अखंड नामस्मरण व अखंड पहारा याची पंचपदी भजनाने सुरुवात होईल, तसेच रामपाठ व विष्णुसहस्त्रनाम होईल.दहा दिवसीय या महोत्सवाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे, ती दररोज सकाळी ’श्रीं’च्या पादुकांची व प्रतिमेची पालखी मिरवणूक. रोज सकाळी दहाच्या सुमाराससुरू होणारी ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांनी फिरणार आहे. संध्याकाळी पंचपदी भजन व आरती झाल्यानंतर समाधी मंदिराला पालखीच्या तीन प्रदक्षिणा घालण्यात येतील.

महोत्सवाच्या कालावधीत नित्योपासना, भजन, कीर्तन, नामस्मरण, प्रवचन, गायन अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नामांकित कीर्तनकार,प्रवचनकार आणि संत साहित्याच्या अभ्यासकांची उपस्थिती महोत्सवात लाभणार आहे. भाविकांसाठी प्रसाद, निवास, पिण्याचे पाणी आणि आरोग्य व्यवस्था यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही महोत्सवाचा मुख्य दिवस 14 डिसेंबरला (रविवार) मोठ्या भक्तिभावात साजरा केला जाणार आहे. या दिवशी पहाटे पाच वाजून 55 मिनिटांनी ’श्रीं’च्या समाधीवर गुलाल व फुले अर्पण करून पुण्यतिथी सोहळ्याचा मुख्य विधी होईल.


Back to top button
Don`t copy text!