सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला; ऑगस्टच्या वेतनासोबत मिळणार फरक


स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑगस्ट : महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता फरक देण्याचा शासन निर्णय निर्गमित केला आहे. जानेवारी २०२५ पासून पूर्वलक्षी प्रभावाने हा फरक ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत दिला जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल सेवानिवृत्त संघटनेचे राज्य संस्थापक अध्यक्ष अनिलकुमार कदम यांनी दिली आहे.

या शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर, सातारा जिल्हा प्रशासनाने तातडीने महागाई भत्ता फरकाची बिले तयार करून ती ऑगस्टच्या वेतनात समाविष्ट करावीत, अशी मागणी महाराष्ट्र एकता क्रांती दल सेवानिवृत्त संघटनेने केली आहे. गौरी-गणपती सणाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांना वेळेत पैसे मिळाल्यास त्याचा उपयोग होईल, असे संघटनेने म्हटले आहे.

प्रशासनाने वेळेत कार्यवाही केल्यास सणासुदीच्या काळात हा वाढीव महागाई भत्ता आणि फरक उपयोगी ठरेल, अशी भावना अनेक कार्यरत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.


Back to top button
Don`t copy text!