
दैनिक स्थैर्य । दि. १६ नोव्हेम्बर २०२२ । सातारा । जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी मुकबधिर विद्यालयावर अन्याय केला आहे. त्या अन्यायाच्या निषेधार्थ आम्ही जिल्हा परिषदेच्यासमोर सोमवारपासून उपोषणाला बसलेलो आहे. आम्ही शाळा चालवण्यास सक्षम आहोत, असा दाखला देत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असे मुकबधिर विद्यालयाचे संस्थापक पार्थ पोळके यांनी दिला आहे. या आंदोलनात मुकबधिर विद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिल्लारी यांना दिले आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, समता शिक्षण मंडळाच्या स्थापना 1984 साली करण्यात आली. संस्थेचे मुकबधिर विद्यालय आहे. हे विद्यालय 38 व्या वर्षात पदार्पण करत आहे. मुकबधिर विद्यालय ही साताऱयाची शान आहे. संस्थेने दिव्यांगाचे शिक्षण आणि पूनर्वसन हे ध्येय ठेवल्यामुळे पहिले काही वर्ष एससीसी बोर्डाचे रजीस्ट्रेशन नसल्याने 17 नंबरचा फॉर्म भरुन बोर्डाच्या परीक्षेला विद्यार्थी बसवले. पास झालेल्या विद्यार्थ्यांना आयटीआयसाठी मुंबईला पाठवले. आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांना सातारा एमआयडीसी व शासकीय नोकऱया दिल्या. सुमारे 79 विद्यार्थ्यी एमआयडीसीमध्ये काम करत आहेत. यातील बऱयाच विद्यार्थ्यांचे विवाह लावून दिले. संस्थेच्या मुक बधिर विद्यालयातीलच 12 मुले व 12 मुलींचे पालकांच्या सहमतीने विवाह लावले आहेत. आणि त्यांना नोकऱयाही लावून दिल्या आहेत. या कुटुंबाची मुले निरनिराळय़ा शाळेत शिक्षण घेत आहेत. शहर आणि राज्यातल्या सांस्कृतिक कार्यक्रमात या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. बक्षीसेही आणली आहेत. साताऱयाच्या ग्रंथ महोत्सवामध्येही मुक बधिर विद्यालय नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले आहे. सातारच्या जनतेनेही या विद्यालयाच्या अशा कार्यक्रमाचे कौतुक केले आहे. शहरातील जनतेने, व्यापाऱयांनी शाळेच्या इमारतीसाठी मदत केली आहे. गेली 38 वर्षात शासन दरबारी या विद्यालयाच्या कोणत्याही तक्रारी नव्हत्या. मात्र, गेल्या दोन वर्षात जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी कारण नसताना शाळेला बदनाम करण्याचा विढा उचलला आहे. कदाचित त्यांचे काही हितसंबंध शाळेने सांभाळले नाहीत म्हणून हा राग समाजकल्याण अधिकाऱयांनी काढला आहे. पालकांची कुठलीही तक्रार नाही. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची या समाजकल्याण अधिकाऱयांनी दखल घेतली नाही. 1996 पासून शाळेचा दहावीचा निकाल 100 टक्के लागला आहे. 30 ते 35 विद्यार्थी उच्च शिक्षण महाविद्यालयात घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रगतीची कोणतीही चौकशी न करता खोटेनाटे रिपोर्ट शासनाकडे पाठवून संस्थेच्या मुकबधिर विद्यालयाची जाणीवपूर्वक बदनामी करण्याचे काम केले आहे. विद्यालय हे विद्यार्थी केंद्रीत असते. विद्यार्थ्यांची प्रगती हा शिक्षणाचा उद्देश असतो. याकडे जिल्हा समाजकल्याण अधिकारी चुकूनही लक्ष देत नाहीत. गेल्या 38 वर्षात अनेक अधिकाऱयांनी विद्यालयाच्या कामकाजाच्या विषयी, प्रगती विषयी समाधान व्यक्त केलेले असताना सध्याच्या समाजकल्याण अधिकारी घोळवे यांच्या हितसंबंधाची पूर्तता न केल्यामुळे विद्यालयाला त्रास देवून नोंदणी रद्द करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. विद्यालयातील 70 ते 75 विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार केला नाही. विद्यालयात कामकाज करणाऱया कर्मचाऱयांचा सेवेचा विचार केला नाही. विद्यालयाची नोंदणी रद्द झाल्यामुळे सर्व कर्मचाऱयांची उपासमार होणार आहे. याचाही विचार त्यांनी केला नाही. सामाजिक न्याय विभागात काम करणाऱया या अधिकारी मॅडमला विद्यालयातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी कर्मचाऱयांची उपासमार होणार आहे याची किंचितही फिकीर नाही. वास्तविक पहाता घोळवे यांची सीबीआयमार्फत चौकशी केली तर अनेक बाबी उघडकीस येतील. त्यातूनच हे विद्यालय बंद करण्याचे कारस्थान समोर येईल. घोळवे यांच्या अन्यायाच्या विरोधात हा अमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. माझ्या या उपोषणालाबरोबर विद्यालयातील कर्मचारी, पालक, आजीमाजी विद्यार्थी सहभागी होत आहेत. घोळवे यांची बदली जिह्याबाहेर करुन त्यांची चौकशी करावी, अशी मागणी पार्थ पोळके यांनी केली आहे.