आणि निरागसता अनुभवता आली…

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


एक सूर्या है एक गगन है

एक ही धरती माता

दया करो प्रभू एक बनें

सब सब का एक से नाता

राधा मोहन शरणम

सत्यम शिवम सुन्दरम!!

गेल्या काही दिवसांपासून फलटण येथील मूक बधिर विद्यालय येथे जाण्याचा मानस होता; तो नुकताच पूर्णत्वास गेला. महात्मा शिक्षण संस्थेच्या मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना नाष्ट्याचे पदार्थ अर्थात पावभाजी सोबत पुलाव आणि गुलाबजाम असा बेत ठरला. ते खाताना या मुलांच्या चेहऱ्यावर अत्यंत निरागस भाव आणि आनंद दिसून आला.

शाळेची माहिती देताना संस्थाचालक दादासाहेब चोरमले यांनी शाळेच्या कार्याचा आढावा घेतला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शाळेची सुरुवात केली असल्याचे सांगितले. सध्या असणारी शाळेची इमारत, तिथे शिकत असणारे विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे शिक्षक अत्यंत प्रामाणिकपणे कार्यरत असलेले दिसले.

या शाळेतील विद्यार्थी फक्त शिक्षणच घेत आहेत असे नव्हे तर हे चिमुकले विद्यार्थी अर्थार्जनाचेही काम करत असल्याचे आढळले. समाजातील सर्वच स्तरातील लोकांनी या शाळेला आणि या विद्यार्थ्यांना सहकार्य करण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची खरेदी करावी.

या शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांना आवश्यक असणारी फळे व भाजीपाला यांची लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना सेंद्रिय पद्धतीने बनवलेल्या भाज्या खायला मिळतात.

या मुलांचा समावेश दिव्यांग गटात होत असला तरी ही सर्वसाधारण मुलांना लाजवेल असे कार्य करत आहेत. त्यांच्या अंगी एक वेगळीच शिस्त दिसून आली. आपण आपले ताट स्वतः घेऊन येणे आणि स्वतः जागेवर नेऊन ठेवणे आणि तेही कोणतीही गडबड गोंधळ न करता याचे खरोखरच कौतुक करणे अपरिहार्य आहे. त्याचप्रमाणे येथील शिक्षकही खुप उत्तम पद्धतीने अध्यापनाचे कार्य करत आहेत.

निवासी विद्यार्थी आणि तेही मूकबधीर! अशा एका विद्यार्थ्याला सांभाळणे पालकांना अवघड वाटते पण येथे जवळपास ५० विद्यार्थ्यांना एकत्रित सांभाळण्याचे काम या शाळेमार्फत केले जात आहे. खरोखरच या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि संस्थाचालकांना कोटी कोटी धन्यवाद देण्याची गरज आहे.

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी

सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री

भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी

सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खात्री

तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे

माणसाने माणसाशी माणसासम वागणे

हीच अमुची प्रार्थना, अन् हेच आमुचे मागणे!!

– श्रीमती उमा रुद्रभटे, फलटण

Back to top button
Don`t copy text!