महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा व बालनाट्य स्पर्धांना 15 डिसेंबरपर्यंत प्रवेशिका पाठविण्याची मुदत; तर 15 जानेवारी पासून सादरीकरणाला सुरुवात होणार – सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांची घोषणा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २३ नोव्हेंबर २०२१ । मुंबई । शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने येत्या 1 जानेवारी 2022 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक 30 नोव्हेंबर, 2021 पर्यंत प्रवेशिका मागविण्यात आल्या होत्या. या अनुषंगाने अनेक रंगकर्मी तसेच सहभागी संस्था व संघटना यांनी प्रवेशिका सादर करण्याची मुदत तसेच सादरीकरणासाठी मुदतवाढ मिळावी, अशी विनंती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली होती. या विनंतीचा विचार करुन सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी राज्य नाट्य व बालनाट्य स्पर्धेची प्रवेशिका सादर करण्याची मुदत 15 डिसेंबर पर्यंत तर नाट्य स्पर्धा सादरीकरण दिनांक 15 जानेवारी पासून सुरुवात होईल, अशी घोषणा आज केली.

राज्यातील जास्तीत जास्त संस्थांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री महोदयांनी केले आहे. तसेच कोविड विषयक नियमांचे पालन करून नाटकांची तालीम व प्रयोग सादरीकरण करावे असेही आवाहन श्री. देशमुख यांनी केले आहे.
सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्या घोषणेस अनुसरून संचालनालयामार्फत प्रसिद्ध पत्रक काढण्यात येईल असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने स्पष्ट केले आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम संचालनालयाच्या www.mahasanskruti.org या वेबसाईटवर नवीन संदेश या मथळयाखाली उपलब्ध होतील असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने  स्पष्ट केले आहे.


Back to top button
Don`t copy text!