
स्थैर्य, फलटण, दि. १३ ऑक्टोबर : राज्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
यापूर्वी ही मुदत १३ ऑक्टोबर रोजी संपणार होती, मात्र आता नागरिकांना आणखी चार दिवसांची संधी मिळाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज याबाबतचा निर्णय जाहीर केला. नगरपरिषदा व नगरपंचायत निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी ८ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीमध्ये अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात समाविष्ट झाल्याच्या तक्रारी फलटण शहरातून आल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर, हरकतींसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी होत होती.
या मुदतवाढीमुळे आता नागरिकांना आपल्या हरकती व सूचना १७ ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येणार आहेत.
त्यानुसार, प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी आता २८ ऑक्टोबरऐवजी ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.