मोरणा नदीत आढळला मृत बिबट्या

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


बिबट्याचा मृत्यू क्रोनिक न्यूमोनियामुळे ,बिबट्याची नखे, दात, कातडी हे सर्व चांगल्या स्थितीत

स्थैर्य, सातारा, दि. १९ : मोरगिरी भागातील माणगाव येथे मोरणा नदीत शनिवारी बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. या बिबट्याचा मृत्यू क्रोनिक न्यूमोनियामुळे झाला असल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात म्हटले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी, दि. 18 रोजी पाटण वनपरिक्षेत्रातील माणगाव येथे मोरणा नदीत वाहून आलेला बिबट्या नदीकडेला जनावरे चारत असलेल्या मुलांनी पहिला. त्यांनी ही माहिती तत्काळ वनविभागाला दिली. त्यानंतर लगेच पाटणचे वनक्षेत्र अधिकारी विलास काळे, मल्हारपेठचे वनपाल व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मुलांच्या मदतीने मृत बिबट्यास बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मृत बिबट्याच्या शवविच्छेदनासाठी पाटणच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क होऊ शकला नसल्याने मृत बिबट्यास तळबीड, ता. कराड येथील पशुसंवर्धन दवाखान्यात नेण्यात आले. तिथे डॉ. भुतकर यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन सहाय्यक वनरक्षक किरण कांबळे, माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांच्यात उपस्थितीत केले. यावेळी बिबट्याचा मृत्यू क्रोनिक न्यूमोनियामुळे झाला असल्याचे डॉक्टरानी सांगितले. बिबट्याची नखे, दात, कातडी हे सर्व चांगल्या स्थितीत आहेत.  वनविभागाच्या वराडे, ता. कराड येथील रोपवाटिकेत या मृत बिबट्याचे दहन करण्यात आले. यावेळी सहाय्यक वनरक्षक किरण कांबळे, माजी मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, पाटणचे वनक्षेत्र अधिकारी विलास काळे, वनपाल ए. पी. जाधव, वनरक्षक रामदास घावटे, बंडू माने, रमेश जाधवर, वराडे, दीपाली अवघडे, वनमजूर सुरेश पवार आदी उपस्थित होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!