
स्थैर्य, फलटण, दि. ०६ ऑगस्ट : कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल आवाडे ग्रुपचे सर्वेसर्वा तथा शेतकरी मित्र दत्तात्रय आवाडे यांचा नुकताच केंद्रीय सहकार व हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे सत्कार करण्यात आला होता. या विशेष सन्मानाबद्दल चौधरवाडी येथील समस्त शेतकऱ्यांच्या वतीने दत्तात्रय आवाडे यांचा सत्कार समारंभ आयोजित करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमात फलटण तालुका कृषी विभाग अधिकारी कुलदीप नेवसे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व पटवून देत त्याबद्दल उपयुक्त माहिती दिली. तसेच, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले सहायक कृषी अधिकारी सचिन जाधव यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सत्काराला उत्तर देताना दत्तात्रय आवाडे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना मोलाचा सल्ला दिला.
यावेळी गावामध्ये येत्या आठवड्यात ‘सेंद्रिय शेतकरी बचत गट’ स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाला ज्येष्ठ शेतकरी मार्गदर्शक गुंजवठे बापू, प्रगतशील बागायतदार अजित निकम, ग्रामपंचायत उपसरपंच रामदास भोसले, शेतकरी संघटनेचे रवींद्र घाडगे यांच्यासह अनेक मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मुकुंद धनवडे यांनी केले. सोमनाथ भोसले यांनी उपस्थितांचे आभार मानले.