
दैनिक स्थैर्य । 6 एप्रिल 2025। फलटण । येथील पुरोहित स्वाहाकार समितीच्यावतीने बुधवार दि. 9 एप्रिल ते शनिवार 12 एप्रिल या कालावधीत श्री यज्ञ मंगल कार्यालय, ब्राह्मण गल्ली येथे श्री दत्त यागाचे आयोजन केले आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त बुधवार दि. 9 रोजी सायंकाळी 4 वाजता स्थलशुध्यर्थ उदकशांत व शांती होम होणार आहे. गुरुवार दि. 10 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता पुण्याहवाचन, मंडपपूजन, देवतास्थापन, श्री दत्त महाराजांना महाअभिषेक होणार आहे. सकाळी 11 वाजता दत्तमालामंत्र जप प्रारंभ होणार आहे. सायंकाळी 5 वाजता आयुर्वेद व दिनचर्या या विषयावर डॉ. श्रीपाद चिटणीस यांचे व्याख्यान होणार आहे.
शुक्रवार दि. 11 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता श्री दत्त महाराजांना अभिषेक, दत्तमालामंत्र जप होणार आहे. सकाळी 10 वाजता अरणीमंथन, अग्निस्थापना यज्ञास सुरुवात, ग्रहयज्ञ व दत्तमालामंत्र हवन होणार आहे. सायंकाळी श्री गुरुमहिमा या विषयावर प्रवचन होणार आहे. रात्री आठ वाजता महाआरती होणार आहे. शनिवार दि. 12 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता पूर्णाहुती व यज्ञाचे उत्तरांग, अवभृतस्नान आदी कार्यक्रम होणार आहे. सकाळी 11 वाजता श्री दत्तयागाविषयी माहितीपर प्रवचन होणार आहे. दुपारी 12 वाजता महाआरती व दुपारी 1 वाजता महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात सातारा येथील वेदमूर्ती चंद्रशेखरशास्त्री जोशी हे प्रवचन सांगणार आहेत. मुख्य आचार्य म्हणून सातारा येथील वेदमूर्ती ओंकार देशपांडे गुरुजी हे काम पाहणार आहेत. या दत्तयागात सहभागी होण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.