
महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे २०२५ चे ‘दर्पण’ पुरस्कार जाहीर झाले आहेत. पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांना ‘विशेष दर्पण’ पुरस्कार जाहीर झाला असून ६ जानेवारीला पोंभुर्ले येथे वितरण सोहळा होणार आहे. वाचा संपूर्ण यादी.
स्थैर्य, फलटण, दि. ०८ डिसेंबर : मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने दिले जाणारे २०२५ चे राज्यस्तरीय ‘दर्पण पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत. यावर्षीचा प्रतिष्ठित ‘विशेष दर्पण’ पुरस्कार पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे यांना जाहीर झाला आहे. तर माहिती व जनसंपर्क विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुण्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे संस्थापक अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये ही घोषणा केली.
राजीव साबडे यांचा विशेष सन्मान
राजीव साबडे यांनी मराठी वृत्तपत्रसृष्टीत सलग ३४ वर्षे पत्रकारिता केली असून सध्या ते पुणे पत्रकार प्रतिष्ठान आणि पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये (पत्रकारिता प्रशिक्षण) कार्यरत आहेत. त्यांच्या या दीर्घकालीन योगदानाची दखल घेऊन त्यांना ‘विशेष दर्पण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
या मान्यवर पत्रकारांचा होणार गौरव
राज्यभरातून विविध क्षेत्रांत ठसा उमटवणार्या खालील पत्रकारांना दर्पण पुरस्कार जाहीर झाले आहेत:
-
शंतनु डोईफोडे: संपादक, दैनिक प्रजावाणी (नांदेड)
-
बसवेश्वर चेणगे: संपादक, ‘गुंफण’ (मसूर, जि. सातारा) – गेली १५ वर्षे सीमाभागात साहित्य व पत्रकार संमेलने आयोजित केल्याबद्दल.
-
जीवनधर चव्हाण: पत्रकार, दैनिक पुढारी (सातारा) – ३२ वर्षे अविरत पत्रकारिता.
-
प्रकाश कुलथे: संपादक, दैनिक स्नेहप्रकाश (श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) तथा राज्य अधिस्विकृती समिती सदस्य.
-
विजय पालकर: पत्रकार, दैनिक लोकमत (माणगाव, जि. सिंधुदुर्ग).
-
श्रीराम जोशी: कार्यकारी संपादक, दैनिक नगर टाईम्स (अहिल्यानगर).
-
डॉ. अनिल काळबांडे: उमरखेड शहर प्रतिनिधी, दैनिक सकाळ (यवतमाळ).
-
आशिष कदम: केंद्रप्रमुख, मँगो एफ.एम. व संपादक, साप्ताहिक वर्तमान (कोल्हापूर).
शासकीय अधिकाऱ्यांसाठी पहिल्यांदाच पुरस्कार
संस्थेने यावर्षीपासून एक नवीन पायंडा पाडला आहे. माहिती व जनसंपर्क विभागातील (DIPR) उत्कृष्ट अधिकारी किंवा प्रभावी वृत्तांकन करणाऱ्या अधिकाऱ्याला यापुढे गौरवण्यात येणार आहे. या श्रेणीतील पहिलाच ‘दर्पण’ पुरस्कार पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांना जाहीर झाला आहे.
६ जानेवारीला पोंभुर्ले येथे सोहळा
रोख रक्कम, शाल, पुष्पगुच्छ, आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा चरित्र ग्रंथ आणि विशेष सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. हे सर्व पुरस्कार ६ जानेवारी २०२६ रोजी (पत्रकार दिन) बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव असलेल्या पोंभुर्ले (ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) येथील ‘दर्पण’ सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.
या निवडीबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव, कृष्णा शेवडीकर आणि कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे अभिनंदन केले आहे.

