धोकादायक फ्युज बॉक्स, कोसळण्याच्या अवस्थेत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि. २० : सहज हाताला येतील असे दरवाजे, धोकादायक फ्युज बॉक्स, कोसळण्याच्या अवस्थेत असलेले वीज वितरण व्यवस्थेचे खांब यामुळे शिवारात रस्त्यावर, घराजवळ धोक्याची कायम टांगती तलवार आहे. या धोकादायक स्थितीकडे वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे. येथील धोकादायक पोलमुळे महिंद, ता.पाटण येथील नागरिक धोकादायक स्थितीत वावरत आहेत. या धोक्यातून आमची सुटका करा, अशी मागणी महिंद ग्रामस्थांनी केली आहे.

याबाबत महिंद येथील सामाजिक कार्यकर्ते व मराठी एकीकरण समितीचे राज्य संघटक राहुल शेडगे, अमर पाटील आदींनी दिलेल्या माहितीनुसार वांग नदी पुलावरून महिंद गावात प्रवेश करताना उजव्या बाजूला वीज वितरणचा डी. पी. असून त्याचा एक दरवाजा गायब आहे. दुसरा कायम उघडा लोंबकळत असतो. फेज व सर्व फिटिंग यंत्रणा खुली आहे तर गावात युवराज साळुंखे यांच्या दुकानासमोर असलेला डी. पी. सुद्धा कायमचा उघडाच आहे. तो तर जरा जास्तच धोकादायक बनला आहे. महिंद-सळवे रस्त्याच्या बाजूने टाकलेल्या लाईनवरचे धरणाच्या बाजूला टेकाच्या शिवारातील खांब खाली झुकलेला आहे, तो कधीही रस्त्यावर कोसळू शकतो. तर मठवाडीच्यापुढे असलेला खांब तर झुकला आहेच. तो केवळ ताण दिलेल्या तारेमुळे कोसळायचा वाचला आहे. माथनेवाडी येथे उत्तम माथने यांच्या घराजवळ असलेला खांबही कललेला आहे. घळणाच्या शिवारातला एक खांब पूर्णपणे कोलमडून कोसळण्याच्या अवस्थेत आहे.

 

वरीलप्रमाणे दोन डी. पी. आणि झुकलेले खांब हा अपघाताला निमंत्रण वा मरणाचे सापळे बनलेले आहेत. ढेबेवाडी येथे जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी सात-आठ महिन्यांपूर्वी घेतलेल्या प्रभाग समिती सभेत विभागातील धोकादायक वीज पोल बदलण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना केल्या होत्या. वीज वितरणच्या अधिकार्‍यांनी पंधरा दिवसात सडके खांब बदलण्याची व झुकलेले खांब सरळ करण्याचे काम पूर्ण करू असे सांगितले होते. अनेक ठिकाणी खांब बदलण्यात आले तर मे महिन्यात महिंद येथील धोकादायक खांब बदलण्याची सूचना जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांनी संबंधित विभागास पत्राद्वारे केली. परंतु महिंद येथील कोसळण्याच्या अवस्थेतील धोकादायक एक पोल तातडीने सरळ करण्यात आला. मात्र अजूनही महिंद येथील काही वीज पोल धोकादायक अवस्थेत आहेत.

येथील वीज पोलचा धोका कायम आहे. त्यामुळे याची ताबडतोब दखल घेऊन वीज वितरणने कार्यवाही करून येथील वीज वितरण व्यवस्था सुरक्षित करावी, अशी मागणी जनतेतून केली जात आहे. तर महिंद येथील सर्व्हेनुसार डोंगरी विकास आराखड्यातून नऊ वीज पोल मंजूर असून धोकादायक पोल लवकर बसविण्यात येतील, अशी माहिती वीज वितरणकडून देण्यात आली.

ढेबेवाडी-भोसगाव येथील प्रभाग सभेत विभागातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार विभागातील धोकादायक विजेचे पोल बदलण्याच्या सूचना प्रभाग सभेत संबंधित अधिकार्‍यांना करून यासाठी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे पाठपुरावा  केला होता. त्यांच्या माध्यमातून डोंगरी विकास आराखड्यातून अनेक ठिकाणी विजेचे पोल बदलले असून ज्या ठिकाणी असे धोकादायक वीज पोल बदलायचे आहते ते वीज वितरणकडून लवकरात लवकर बदलण्यात यावेत.

रमेश अण्णासाहेब पाटील, सदस्य, जिल्हा परिषद, सातारा.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!