मोबाइलमुळे ग्रामीण जीवनात घातक बदल: चर्चा, गप्पा हरवत, व्यसन वाढत!

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 18 जुलै 2024 | फलटण | हल्ली ग्रामीण भागात लहानग्यांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच मोबाइलचा लळा लागलेला दिसत आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तासन् तास रील पाहत बसणारी पोरं ते यूट्यूबवर कीर्तनं, गाणी ऐकणारी प्रौढ माणसं असं चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर, कामांवर आणि सामाजिक प्रकृतीवरही होत आहे.

पूर्वी मोबाइल दुर्मिळ होते, ग्रामीण भागात तर एखाद्या व्यक्तीकडेच मोबाइल असायचा. पण मोबाइल क्रांती आणि इंटरनेटमुळे दर कमी झाले आणि आता प्रत्येक व्यक्तीच्या हातात मोबाइल आहे. मुलांना मोबाइल देताना पालक दहादा विचार करायचे, पण आता शाळा, कॉलेजमध्ये मुलं दप्तरात मोबाइल घेऊन जातात आणि चिमुकल्यांना जेवू घालतानाही मोबाइल दाखवला जातो.

स्मार्टफोनचा वापर संपर्क, व्यवसाय, मनोरंजन यासाठी करता येतो. तरीही निव्वळ मनोरंजनासाठी होणारा स्मार्टफोन वापर आणि त्याचा अतिरेक घातक ठरत आहे. स्मार्टफोनवर उपलब्ध गेम्सच्या नादात मुलांनी जीव गमवल्याची अनेक उदाहरणे आहेत. लहानग्यांना शांत करण्यासाठी दाखवला जाणारा मोबाइल त्यांच्या डोळ्यांना अपाय करतो. प्रौढांमध्येही मोबाइलमुळे संवाद, वाचन कमी झाल्याने ताणतणाव वाढत आहे. अनेकांना तर मोबाइलचं व्यसन जडलंय. यातून चिडचिड, विसंवाद वाढत आहे.

पूर्वी मोबाइल, टीव्ही नव्हते. टीव्हीचाही इतका प्रभाव नव्हता. लोकं एकमेकांच्या घरी जात होती. पारावर, ओसरीवर, झाडांखाली गप्पा, चर्चा रंगलेल्या दिसत होत्या. आता मोबाइलमुळे माणसं जवळ आली असली तरीही त्यांच्यातील संवाद हरवत चाललाय, हे समाजासाठी घातक आहे.

मोबाईलचा वापर कमी करण्यासाठी काय करावे?

  • पालकांनी मुलांना मोबाइलचा वापर मर्यादित करण्यासाठी नियम घालून द्यावेत.
  • मुलांना मोबाइलऐवजी इतर खेळ, छंदांमध्ये रस घेण्यास प्रोत्साहन द्यावे.
  • कुटुंबात एकत्र वेळ घालवणे, संवाद वाढवणे गरजेचे आहे.
  • समाजात जागरूकता कार्यक्रम आयोजित करून मोबाइलच्या अतिवापराचे धोके लोकांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे.

ग्रामीण जीवनात सामाजिक बंध मजबूत करण्यासाठी आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी मोबाइलचा वापर मर्यादित करणे गरजेचे आहे.


Back to top button
Don`t copy text!