धोकादायक फलकांवर आता फौजदारी

सातारा पालिका प्रशासन सक्रिय; शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या सूचनेनंतर जाग


दैनिक स्थैर्य । 4 ऑगस्ट 2025 । सातारा। रस्त्यावर शुभेच्छा आणि जाहिरात फलक उभारल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, काही वेळेला अपघातही होत आहेत. यामुळे धोकादायक फलकांचा प्रश्न नेहमीच चर्चेत येतो; परंतु धोका आणि इतर बाबींकडे दुर्लक्ष करत शुभेच्छा आणि जाहिरात फलक उभारण्याची चढाओढ सातार्‍याबरोबरच उपनगरांमध्ये सुरू आहे.

या चढाओढीला पायबंद घालण्याची सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केल्यानंतर पालिका प्रशासन सक्रिय झाले आहे. पालिकेने अशा फलकांच्या विरोधात धोरण जाहीर करत थेट फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.पालिकेने शहरातील जाहिरातधारक, प्रिटिंगप्रेसधारक व फलक उभारणारे मंडप, डेकोरेटर्स यांना अनधिकृत, विनापरवानाहोर्डिंग, फलक, बॅनर्स, पोस्टर्स आदी लावल्याने शहराचे विद्रुपीकरण होत असल्याचे सूचित केले आहे. याबरोबरच रस्त्यावर फलक उभारल्याने वाहतुकीचा खोळंबा होतो अथवा वाहतूक सुरळीत चालत नाही. त्यातूनच अपघात घडतात. यामुळे अनधिकृतरीत्या, तसेच ऐतिहासिक वास्तूंसमोर अनधिकृतरीत्या मोठ्या आकाराचे फलक उभारून ऐतिहासिक वास्तू पूर्णपणे झाकली जाते. त्याचे विद्रुपीकरण होते. त्यामुळे अनधिकृत विनापरवाना फलक, बॅनर्स, पोस्टर्स आदी लावले जाऊ नये. अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.

मी असो अथवा उदयनराजे असो अथवा अन्य कोणाचाही वाढदिवस असो रस्त्यावर शुभेच्छा फलक उभारले जाऊ नयेत, यासाठी मी स्वतः आग्रही आहे. नागरिकांना त्रास होईल अशा पद्धतीने उभारल्या जाणार्‍या फलकांना पालिका आणि पोलिस प्रशासनाने परवानगी देऊ नये.
– शिवेंद्रसिंहराजे भोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री

मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर मुंबई पोलिस अधिनियम, महाराष्ट्र विद्रुपीकरण विरोधी कायदा, भारतीय दंड विधान संहितामधील तरतुदीनुसार गुन्हे दाखल केले जातील.
– अभिजित बापट, मुख्याधिकारी


Back to top button
Don`t copy text!