
स्थैर्य, फलटण, दि. २५ सप्टेंबर : फलटण तालुक्यासाठी जीवनदायी ठरणाऱ्या नीरा प्रणालीतील सर्व प्रमुख धरणे आजही पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. भटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या चारही धरणांमध्ये मिळून एकूण ४८.३३ टीएमसी म्हणजेच १०० टक्के उपयुक्त पाणीसाठा स्थिर असल्याची माहिती नीरा उजवा कालवा विभागाने दिली आहे.
धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक कमी झाल्याने वीर धरणातून नीरा नदीच्या पात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या विसर्गात घट करण्यात आली आहे. काल रात्रीपर्यंत ७८३७ क्युसेक्स असलेला विसर्ग आज कमी करून २८०० क्युसेक्स करण्यात आला आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या नीरा देवघर धरणातूनही ३५० क्युसेक्स पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
सर्व धरणे शंभर टक्के भरलेली असल्याने तालुक्याचा आगामी वर्षासाठीचा शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. असे असले तरी, नदीपात्रातील विसर्गात पाण्याच्या आवकनुसार बदल होऊ शकतो, त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.