नीरा खोऱ्यातील धरणे 93 टक्के भरली; भाटघर, देवघर जलाशये तुडुंब, शेतकऱ्यांना मोठा दिलासा

गतवर्षीच्या तुलनेत पाणीसाठा किंचित कमी


स्थैर्य, फलटण ,दि. ०५ ऑगस्ट : फलटण तालुक्यासह पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांची जीवनदायिनी असलेल्या नीरा खोऱ्यातील प्रमुख चार धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. भाटघर, वीर, नीरा देवघर आणि गुंजवणी या धरणांमध्ये मिळून आज अखेर 45.01 दशलक्ष घनमीटर (TMC) पाणीसाठा जमा झाला असून, हा एकूण क्षमतेच्या 93.13% टक्के आहे.

धरणक्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे भाटघर आणि नीरा देवघर ही दोन प्रमुख धरणे जवळपास शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत. या समाधानकारक पाणीसाठ्यामुळे फलटण तालुक्यातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, आगामी रब्बी हंगामासाठी पाण्याची चिंता मिटली आहे.

दोन धरणे काठोकाठ

नीरा उजवा कालवा विभागाने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, सर्वात मोठे असलेले 23.50 TMC क्षमतेचे भाटघर धरण 100 % भरले आहे. तर, 11.73 TMC क्षमतेचे नीरा देवघर धरणही 90.69 % (10.63 TMC) भरले आहे. या दोन्ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे.

वीर आणि गुंजवणी धरणांची स्थिती

नीरा उजवा आणि डाव्या कालव्यांना पाणीपुरवठा करणारे 9.41 TMC क्षमतेचे वीर धरण सध्या 95.33% (8.97 TMC) भरले आहे. या धरणातून सध्या नीरा नदीपात्रात 19.067 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. 3.69 TMC क्षमतेचे गुंजवणी धरण 71.56% (2.64 TMC) भरले आहे.

गतवर्षीपेक्षा साठा कमी

यंदाचा पाणीसाठा जरी समाधानकारक असला तरी, तो गेल्या वर्षीच्या तुलनेत किंचित कमी आहे. मागील वर्षी याच दिवशी (४ ऑगस्ट २०२४) या चारही धरणांमध्ये मिळून 46.60 TMC पाणीसाठा होता, जो एकूण क्षमतेच्या 96.42 टक्के होता.

या उपलब्ध पाण्यामुळे शेतीच्या तसेच पिण्याच्या पाण्याची वर्षभराची सोय झाली आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास सर्व धरणे लवकरच १०० टक्के भरतील, अशी अपेक्षा जलसंपदा विभागाकडून व्यक्त केली जात आहे.

धरणाचे नाव एकूण क्षमता (TMC मध्ये) आजचा उपयुक्त साठा (TMC मध्ये) आजची टक्केवारी गतवर्षीचा साठा (TMC मध्ये) एकूण पाऊस (मि.मी.)
भाटघर २३.५० 22.77 96.91 % 23.50 580
वीर ९.४१ 8.97 95.33 % 8.83 170
नीरा देवघर ११.७३ १0.63 90.69 % 11.07 1475
गुंजवणी ३.६९ २.६४ 71.56 % 3.30 1693
एकूण ४८.३३ 45.01 93.13 % 46.60


Back to top button
Don`t copy text!